मुंबई : रुळांजवळील झोपडपट्टया आणि प्रवाशांकडून रेल्वे स्थानक हद्दीत मोठय़ा प्रमाणात कचरा टाकून अस्वच्छता पसरवली जात आहे. कचऱ्याचे साम्राज्य असल्याने ते काढण्याची डोकेदुखी मध्य रेल्वेसमोर असते. २०२१-२२ मध्ये सुमारे १ लाख ६६ हजार क्युबीक मीटर कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. हा कचरा जमा करण्यासाठी रेल्वेकडून कचरा विशेष रेल्वेगाडीही चालवण्यात येते.
मध्य रेल्वेचे उपनगरीय जाळे खूपच मोठे आहे. यात रेल्वे रुळांजवळ १३ हजाराहून अधिक झोपडय़ा आहेत. सॅण्डहस्र्ट रोड, भायखळा, परेल, माटुंगा, कुर्ला, कुर्ला ते ट्रॉम्बे, घाटकोपर, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली, कल्याण यांसह अन्य रेल्वे हद्दीत या झोपडय़ा आहेत. झोपडय़ांमधून सांडपाण्यासह अन्य कचरा रुळांवर टाकला जातो. प्रवासीही प्लास्टिकसह अन्य कचरा टाकत असतात. मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्ददरम्यान चिखल आणि कचरा गोळा करण्यासाठी कचरा विशेष रेल्वेगाडीही चालवण्यात येते. साफ केलेला चिखल आणि कचरा पोत्यामध्ये भरला जातो आणि नंतर तो कचरा विशेष रेल्वेगाडीत ठेवला जातो. या कचरा विशेष रेल्वेगाडीला स्वच्छता रथ असे नावही दिले आहे. २०२१-२२ या वर्षांत उपनगरीय विभागातील रुळांवरून १ लाख ६६ घनमीटर कचरा गोळा केला आहे. २०२०-२१ मध्ये १ लाख सात हजार घनमीटर कचरा आणि २०१९- २० मध्ये ९५ हजार घनमीटर कचरा मध्य रेल्वे उपनगरीय हद्दीतून गोळा करण्यात आला होता.
मध्यरात्री उपनगरीय सेवा बंद झाल्यावर तसेच मेगाब्लॉकमध्ये वाहतूक कमी असताना ही कामे केली जात असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या कचऱ्यामुळे रूळ गंजतात आणि त्यांची झीजही होते. त्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी होते. साचलेल्या कचऱ्यामुळे रूळाखालून जाणारे नालेदेखील तुंबतात, ज्यामुळे पावसाळय़ात रुळांवर पाणी साचते. तसेच सांडपाणी किंवा कचऱ्यामुळे रेल्वेचे डबे रुळांवरून घसरण्याच्याही घटना घडल्या आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले