मुंबई : राज्यात यंदा भीषण दुष्काळ पडला असून राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अभिनेता अमीर खान नेतृत्व करत असलेल्या पाणी फाऊंडेशनची ‘वॉटर कप’ पाचवी स्पर्धा होणार असून या स्पर्धेला राज्य सरकारने संपूर्ण सहकार्य जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वॉटर कप चळवळीचा नियमीत आढावा घेणार आहेत.
राज्यात दुष्काळी उपाययोजना करण्याला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मृद व जलसंधारण विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थाही दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सरसावल्या आहेत. अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनने २०१६ ते २०१९ दरम्यान चार वॉटर कप स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांमुळे पाणलोट क्षेत्र विकासामध्ये जनतेचा मोठा सहभाग वाढला होता. पाणी फाऊंडेशनसोबत यावेळी चंद्रा फाऊंडेशन दुष्काळ हटवण्याच्या कामात सहभागी होणार आहे.
बंद पडलेली वॉटर कप स्पर्धा यंदा होणार आहे. लोकचळवळीतून निर्माण होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता राखली जावी, यासाठी वॉटर कप स्पर्धेचा नियमित आढावा घेतला जावा, अशी इच्छा अमीर खान याने राज्य शासनाकडे व्यक्त केली होती. त्यानुसार मृद व जलसंधारण विभागाने सोमवारी दोन समित्यांची स्थापना केली. राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहील. वॉटर कप चळवळीचा आढावा घेणे, जलसंधारण कामांचे सनियंत्रण करणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दुष्काळी उपाययोजना कामांच्या प्रगतीवर देखरेख करणे ही कामे समिती करेल.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर समिती गठीत करण्यात आली आहे. वॉटर कपच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाच्या विविध विभागांना निर्देश देणे हे या समितीचे मुख्य काम आहे. जलसंधारणाच्या कामांच्या प्रगतीचे जीआयएस, उपग्रह प्रतिमा आणि भ्रमणध्वनी आधारित निरीक्षण प्रणाली व डॅशबोर्डच्या माध्यमातून सनियंत्रण करण्याचे काम राज्यस्तर समिती करणार आहे. २०१९ च्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील ७६ तालुक्यांमधील तब्बल ४,७०६ गावे सहभागी झाली होती. यंदा सहभागी गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
