मुंबई : महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाच्या कामासाठी मंगळवार, २७ जानेवारीपासून शनिवार, ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील ११ विभागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या संबंधित विभागात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील विभागांमध्येही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे त्या परिसरांमधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
”या” भागांत पाणीकपात
या कालावधीत शहरातील ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, ‘बी’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर, ‘ई’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ दक्षिण’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ उत्तर’ विभागातील संपूर्ण परिसर, पूर्व उपनगरांतील ‘टी’ विभागातील मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) परिसर, ‘एस’ विभागातील भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) परिसर, ‘एन’ विभागातील विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर परिसर, ‘एल’ विभागातील कुर्ला (पूर्व), ‘एम पूर्व’मधील संपूर्ण विभाग, ‘एम पश्चिम’मधील संपूर्ण विभागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
