राज्यात गेल्या काही वर्षांत पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची सर्वकष चौकशी करून पुढील अधिवेशनात अहवाल मांडण्यात येईल तसेच यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
राज्यातील ११६४ पाणीपुरवठा योजना कालबाह्य़ झाल्या आहेत तर ६३ योजनांमध्ये ग्रामपंचायतींनी वीजबिल न भरल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. याशिवाय अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे स्रोत बंद पडल्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे १९८९ गावे व २३५८ तांडे तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त असून सुमारे चार नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याचा मुद्दा आमदार भरत भालके, अमिन पटेल, भास्कर जाधव, अस्लम शेख आदींनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थित केला. मराठवाडय़ात तीव्र पाणी टंचाई असून ९७१ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आगामी काळात हजाराहून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे तसेच पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठय़ाप्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी अनेक सदस्यांनी केली. पाण्याची लूट करणाऱ्यांची चौकशी करण्याबरोबरच एकूणच पाणीपुरवठा योजनांच्या परिस्थिचा र्सवकश अहवाल आमागी अधिवेशनात सादर करू असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले.