मुंबई :  जलसंवर्धनासारख्या महत्त्वाच्या विषयावर सर्वसमावेशक विचारमंथन करण्यासाठी जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज असून देशात ‘जल जीवन मोहिमे’ अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पुरविण्याचे ध्येय आहे व त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंगळवारी येथे केले.

ब्रह्मा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘भारताचे २०४० पर्यंतचे जल जीवन उद्दिष्ट’ या विषयावरील राष्ट्रीय जल परिषदेत बोलताना शेखावत म्हणाले, ‘जल जीवन अभियान’ अंतर्गत हरियाणा, तेलंगणा, गोवा या राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता शंभर टक्के नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर, बिहार, पंजाब या राज्यांमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आले आहे. केंद्र सरकारने राज्यांशी व्यापक चर्चा करून २५ डिसेंबर २०१९ रोजी ‘प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी’ योजनेचा आराखडा बनविला. त्याआधी १६.५ टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. ते प्रमाण गेल्या तीन वर्षांत ५० टक्के झाले आहे. आपल्या देशात सरासरी पावसाचे वार्षिक प्रमाण ११८४ मि.मी आहे. दरवर्षी चार हजार दशलक्ष क्युबिक मीटर पाणी पावसापासून मिळते. त्यामुळे पावसाचे पाणी वाचवण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेखावत यांनी केले. 

हवामानबदल समस्येमुळे पर्जन्यमान बदलले आहे. पूर्वी सरासरी पर्जन्यमान ९० दिवस होते, हे प्रमाण सध्या २०-२२ दिवसांवर आले आहे. आजही आपण ६५ टक्के भूजलीय पाण्यावर अवलंबून आहोत. गेल्या दोन वर्षांत देशातील ७०० जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक जलसंवर्धनाची कामे करण्यात आली आणि त्यासाठी ६५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. देशात १०६ जलप्रकल्प रखडलेले होते व त्यातील २६ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. ते पूर्ण झाल्यामुळे देशभर ३० लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली आहे, असे शेखावत यांनी सांगितले.