मुंबई : शहर आणि पूर्व उपनगराला पाणी पुरवठा करणारी मोठी जलवाहिनी मुलुंड जकात नाक्याजवळ फुटली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून त्यामुळे जलवाहिनीतून पाण्याचे उंच फवारे उडू लागले आहेत. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असून पालिकेच्या जलअभियंता विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या घटनेमुळे शहर आणि पूर्व उपनगरात मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत १५ टक्के पाणी कपात तातडीने लागू करण्यात आली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई – २’ जलवाहिनीस धक्का लागला. त्यामुळे जलवाहिनी फुटली व मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली. पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
या कालावधीत म्हणजे सोमवार दिनांक २७ मार्च रोजी रात्री १० वाजेपासून बुधवार २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. याकाळात मुलुंड, भांडूप, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग, कुर्ला (पूर्व) विभाग, देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथे पाणी कपात करण्यात येणार आहे. तसेच शहर भागात चर्चगेट, कुलाबा, डोंगरी, माझगाव, मशीद बंदर, भायखळा, लालबाग, परळ, नायगाव, वडाळा या भागातही पाणी कपात होणार आहे.