मुंबई : वरळी परिसरातील श्रीराम मिल येथे मुंबई महानगरपालिकेचे कामकाज सुरू असलेल्या ठिकाणी आज रविवारी पहाटे ५ च्या सुमारास पेय जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. उच्चदाबाने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे.
हा परिसर मुंबई महानगरपालिकेच्या जी-दक्षिण विभागात येत असल्यामुळे, येथील नियंत्रण कक्षाशी स्थानिकांनी दोन ते तीन वेळा संपर्क साधल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संबंधित पाहणी केली. ‘वरळीतील श्री राम मिल परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटदाराकडून मलजलवाहिनीचे कामकाज सुरू आहे. त्या कामदारम्यान जलवाहिनी फुटल्याचा अंदाज आहे. या घटनेची आम्ही अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊ आणि कंत्राटदाराकडून या पेयजलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करून घेऊ.
VIDEO::
नागरिकांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नाही, यावर आमचे विशेष लक्ष असेल’, असे आता जी-दक्षिण विभागाच्या कामगारांकडून सांगण्यात आले आहे. पहाटेपासून हजारो लीटर पाणी वाया गेले असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना साचलेल्या पाण्याचा फटका बसत आहे. ही पेयजल वहिनी असल्यामुळे दैनंदिन पाणी पुरवठावर परिणाम होण्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काल सायंकाळपासूनच या जलवाहिनी गळत होती. परंतु यावर ठोस उपाययोजना केली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वरळीतील श्री राम मिल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटदाराकडून मलजलवाहिनीचे कामकाज सुरू असल्यामुळे, याठिकाणी वाहतूककोंडीचा सुद्धा नागरिकांना सामना करावा लागत आहे.