ठाणे येथील ओवळा भागात शुक्रवारी सकाळी मीरा-भाईंदर महापालिकेस पाणीपुरवठा करणारी स्टेम प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया गेल्याची घटना घडली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत झाला  होता.  स्टेम प्राधिकरणामार्फत मीरा-भाईंदर शहरातील सुमारे १२ ते १५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणारी वाहिनी २८ वर्षे जुनी असून ती शुक्रवारी सकाळी ओवळा भागात फुटल्याने पाणी वाया गेले.
मात्र, या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
सायंकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.