टँकरचालकांनी पाठ फिरवली
लातूरपासून उत्तर प्रदेशातील दुर्गम गावांत पाणी पोहोचविण्यासाठीही रेल्वे धावू लागली असली तरी ऐन उन्हाळी सुटय़ांमुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांतील गर्दी कमालीची वाढत असतानाच रेल्वेवरच पाणीसंकट कोसळले आहे. रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत एकाही टँकरचालकाने निविदाच न भरल्याने पाणीटंचाईचा सामना कसा करायचा, हा यक्षप्रश्न मध्य रेल्वेसमोर उभा आहे.
बाहेरचा कडक उन्हाळा, डब्यातली गर्दी यात आधीच पिचणाऱ्या प्रवाशांच्या हालात आता गाडीतील पाणीटंचाईची भर पडणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेने टँकर चालकांवर गेल्या काही दिवसांत कारवाई सुरू केल्यानंतर टँकर चालकांनी रेल्वेचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता.
छत्रपती शिवाजी टर्मिनस या एका स्थानकाची पाण्याची दैनंदिन गरज २३ लाख लिटर आहे. दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे या प्रमुख स्थानकांची पाण्याची दैनंदिन गरज १२ ते १५ लाख लिटर आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला फक्त ४० टक्के पाणीपुरवठा पालिका करते. पुनप्र्रक्रियेद्वारेही काही पाणी पुन्हा वापरले जाते. तरीही या सर्व स्थानकांत साधारणत: ८ लाख लिटर पाणी टँकरने द्यावे लागते.
रेल्वे कमी दरात टँकरचालकांकडून पाणी विकत घेते. त्यामुळेही टँकर चालकांत नाराजी असली तरी रेल्वेच्या निविदेला प्रतिसाद दिला जात होता. यंदा मात्र मध्य रेल्वेने नुकत्याच काढलेल्या निविदेला एकाही टँकरचालकाने प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एकही निविदा भरली न जाण्यामागे नेमकी कारणे रेल्वेलाही उमगलेली नाहीत. पण टँकरसाठी जादा रक्कम देण्यास रेल्वे असमर्थ आहे, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत अल्केश वॉटर सप्लायच्या अल्केश जगताप यांनी, निविदा न भरण्यामागे पैसे हे कारण नसल्याचे स्पष्ट केले. सध्या टँकर धंद्यालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठय़ासाठी आम्हालाही पुरेसे पाणी मिळत नसल्यानेच अनेकांनी रेल्वेची निविदा भरली नाही, असेही जगताप म्हणाले.

..तर दिघ्याचे पाणी घेऊ
ब्रिटिशांनी रेल्वेसाठी म्हणून खास धरणे बांधली आहेत. त्यापैकी दिघा येथील धरणातून सध्या ठाणे नवी मुंबई या शहरांना पाणी पुरवले जात आहे. मात्र रेल्वेची पाण्याची गरज टँकरच्या माध्यमातून भागली नाही, तर हे पाणी सर्वात आधी रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येईल, असेही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.