मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सातही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना मुंबईतील काही भागांमध्ये पाण्याची चणचण भासत असून मुंबईमधील डोंगराळ भाग, झोपडपट्ट्या, कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या चाळी, टोलेजंग इमारतींलगतच्या चाळींतील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सात धरणांमधून दररोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांमध्ये २४ मार्च २०२६ रोजी सहा लाख १२ हजार ६२९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सातही धरणांमध्ये पाच लाख ५५ हजार ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही मुंबईमधील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून या भागांमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक भागांमध्ये डोंगराळ भाग असून या डोंगराळ भागात झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. डोंगराळ भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे येथील रहिवासी त्रस्त आहेत. मुंबईत अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांनाही पुरेसे पाणी मिळत नाहीत. याचाच फायदा घेऊन डोगराळ भाग आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी माफिया सक्रीय झाले आहेत. पाणी माफियांकडून दामदुप्पट दराने पाणी खरेदी करून रहिवाशांना तहान भागवावी लागत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आल्यानंतर आसपासच्या छोट्या चाळींना अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला. या संदर्भात रहिवाशांकडून तक्रारी केल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून त्याचाही काही ठिकाणच्या जलवाहिन्यांना फटका बसून पाणी गळती होत आहे.

एकूणच अनेक मुंबईकरांना अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून मुंबईकर त्रस्त आहेत. या संदर्भात नगरसेवकांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यावर प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळू शकलेले नाही.

धरणांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

धरणवापरायोग्य पाणीसाठा
अप्पर वैतरणा१,०९,५५०
मोडक सागर४६,५८१
तानसा५४,१६५
मध्य वैतरणा७८,५२७
भातसा३,०३,०९३
विहार१६,९०४
तुळशी३,८१०
एकूण६,१२,६२९
  • २४ मार्च २०२६ – ६,१२,६२९ दशलक्ष लिटर
  • २४ मार्च २०२५ – ५,५५,४०० दशलक्ष लिटर
  • २४ मार्च २०२४ – ४,७२,८४९ दशलक्ष लिटर