मुंबई: उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील पाणी संकट वाढू लागले असून छोटे-छोटे जलस्त्रोत अटू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठय़ातही घट होऊ लागली आहे. राज्यातील धरणांमध्ये ३८.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील उपलब्ध जलसाठय़ातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठय़ासाठी जलसाठय़ाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठय़ाचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी बैठकीत दिली.

टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाडय़ांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावे आणि ४९९ वाडय़ांना १०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाडय़ांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाडय़ांना ७० टँकर्स, औरंगाबाद विभागात ४३ गावे आणि २३ वाडय़ांना ५९ टँकर्स, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस एकाही गावात टँगरची आवश्यकता भासलेली नाही. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात टँकरग्रस्त गावांमध्ये ५३ने आणि वाडय़ांमध्ये ११६ ने वाढ झाली आहे. तसेच टँकर्समध्ये ४६ ने वाढ झाली आहे.

कुठे किती पाणी?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे.

अमरावती : ४५ टक्के

मराठवाडा : ४५ टक्के

कोकण :    ४४ टक्के

नागपूर :    ३५ टक्के

नाशिक :    ३५ टक्के

पुणे :  २८ टक्के 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage dams water supply scarcity affected areas tankers state ysh
First published on: 27-05-2022 at 00:02 IST