मुंबई : मुंबईतील पावसाळय़ापूर्व नालेसफाई रखडत रखडत सुरू असताना मिठी नदीतील गाळ काढण्याचे ८९ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र मुंबईतील पश्चिम उपनगरातील अनेक नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अद्याप शिल्लक असून शहर भागातील नालेसफाईचा वेग कमी आहे. त्यामुळे शहर भागात यंदा पुन्हा पाणी साचण्याची भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

मुंबईच्या नालेसफाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. १५ मेपर्यंत पालिकेने ५० टक्के गाळ काढण्याचे लक्ष्य गाठले आहे. मात्र पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवलीतील अनेक नाले अद्याप गाळाने भरलेले आहेत. तर शहर भागात केवळ ४० टक्के नालेसफाई होऊ शकली आहे. त्यामुळे यावर्षीही शहर भाग पावसाळय़ात पाण्याखाली जाणार, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे.

पावसाळय़ापूर्वी म्हणजेच ३१ मेपूर्वी ७५ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. १५ मेपर्यंत नालेसफाई ५० टक्के झाली असली तरी यंदा मिठी नदीतील ८९ टक्के गाळ काढण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याचे दोन वर्षांचे कंत्राट जानेवारी २०२१ मध्ये देण्यात आले होते. दोन वर्षांत एकूण पाच लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे हे कंत्राट होते. त्यापैकी यावर्षी सव्वादोन लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य होते. त्यातून तब्बल एक लाख ९५ हजार मेट्रिक टन गाळ आतापर्यंत काढून झाला असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

भांडुप फिल्टर पाडा-विहार तलाव परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे. अतिवृष्टीच्या काळात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडू नये, पाण्याचा प्रवाह वाहता राहावा याकरिता गाळ काढण्याची गरज असते. एकूण सुमारे २० किमी लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरात वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला मिळते. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मिठी नदीचे पाणी शहरात शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीला पूरमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळे यंदा मिठी नदीला पूर येणार नाही, अशी अपेक्षा आहे.

नालेसफाई किती टक्के

  • शहर – ४० टक्के
  • पूर्व उपनगर – ६८.०० टक्के
  • पश्चिम उपनगर – ६३ टक्के
  • मिठी नदी – ८९ टक्के
  • छोटे नाले – ७५ टक्के