अमरावती : राज्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत़  सध्या ४०७ गावे आणि ९६५ वाडय़ांसाठी ३५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत टँकरची संख्या ८५ ने वाढली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. यंदा एप्रिल महिन्यात राज्यात पाण्याची टंचाई फारशी जाणवली नाही. त्यामुळे या महिन्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी होती. महिनाभरापूर्वी केवळ ५८ टँकर सुरू होते.  उन्हाळा म्हटला की विदर्भ आणि मराठवाडय़ातील विविध भागांत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा ठरलेलाच आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची मागणी होत असे. परंतु, मागील दोन वर्षांपासून हे चित्र बदलल्याचे दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात गेल्या तीन वर्षांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. त्याचा फायदा यंदाच्या कडक उन्हाळय़ात झाला. यंदा अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये ४८ टक्के तर औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये ४७ टक्के पाणीसाठा आहे. कोकणात ४६ टक्के, नागपूर विभागात ३६, नाशिक विभागात ३८ तर पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागात धरणांमधील पाणीसाठा तुलनेने कमी असला, तरी या विभागात आतापर्यंत एकही टँकर सुरू झालेला नाही. गेल्यावर्षी याच काळात राज्यात ४०२ गावे आणि ७३४ वाडय़ांमध्ये ३१९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा त्यात किंचित वाढ झाली आहे.  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारीपेक्षा खासगी टँकरचा आधार यंत्रणेला असतो. त्यास यंदाचे वर्षही अपवाद नाही.

राज्यात पाणीपुरवठा करत असलेल्या ३५५ टँकरपैकी तब्बल २७६ खासगी टँकर आहेत. उर्वरित टँकर सरकारी आहेत. कोकणात ८९ खासगी, ३ सरकारी, नाशिक विभागात ४६ खासगी, ४४ सरकारी, पुणे विभागात ४२ खासगी, २२ सरकारी, मराठवाडय़ात ४२ खासगी, १० सरकारी तर अमरावती विभागात सर्व ५७ टँकर हे खासगी आहेत.

या जिल्ह्यांना झळा

पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, पुणे, ठाणे, रायगड, पालघर, जालना, िहगोलीसह विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply by tanker on 407 villages in maharashtra more private tankers zws
First published on: 20-05-2022 at 04:12 IST