मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ५० टक्के पाणी जमा झाले असले तरी परळ, शिवडी, लालबाग परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे लालबाग परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. ‘पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा यावेळी रहिवाशांनी दिल्या.
यंदा मोसमी पाऊस लवकरच सुरू झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा धरणात जमा झाला आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरणे पन्नास टक्के भरली असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. यंदा पाणी टंचाईच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. मात्र परळ, लालबाग, शिवडी या ठिकाणी काही भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा दिल्या. तसेच आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. आंदोलनकर्त्या रहिवाशांनी विभाग कार्यालयात घुसून जमिनीवरच ठिय्या दिला. शाखाप्रमुख किरण तावडे, कांचन घाणेकर, स्मिता आंबावले, स्वाती कुंभार, उपशाखाप्रमुख विजय मोडक, मुन्ना मिश्रा, आणि शिवसैनिक तसेच महिला उपस्थित होत्या.
एफ/दक्षिण विभागातील प्रभाग क्रमांक २०४ येथील शहापूरजी पालनजी वसाहत, आंबेवाडी, तावरी पाडा, दत्ताराम लाड मार्ग परिसरामध्ये कित्येक दिवसापासून पाणी टंचाई असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांना पाण्याचा दाब नसल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. सातत्याने तक्रारी देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही त्यामुळे रहिवाशांना विभाग कार्यालयात घुसून आंदोलन करावे लागले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर टॉवर झाले असून आजूबाजूच्या चाळींमधील रहिवाशांना पाणी पुरेशा दाबाने मिळत नाही. त्यामुळे रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे, असे अनिल कोकीळ यांनी सांगितले.
दरम्यान, लालबाग, शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबईत कुठेही पाणी टंचाई नाही. फक्त याच भागात पाणीटंचाई आहे. यामागे काही राजकीय कारणे आहेत का असाही सवाल कोकीळ यांनी उपस्थित केला. अनेकदा अधिकाऱ्यांसोबत बैठका, पाहणी करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे याबाबत शंका येत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.