मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तहान भागविणारे सातही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तलावातील जलसाठा खालावल्याने लागू करण्यात आलेली पाणीकपातही मागे घेण्यात आली. मात्र पश्चिम उपनगरांतील कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून सोसायट्यांना टँकरसाठी दर महिना २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अनेक सोसायट्यांची तहान भागविणे टँकरनाही शक्य होत नाही. परिणामी, सोसायट्यांना पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरमा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात पावसाने ओढ घेतली आणि तलावांतील जलसाठा खालावला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली. जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आणि तलावांतील जलसाठ्यात सुधारणा होऊ लागली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने २२ जुलै रोजी पाणीकपात रद्द केली. मात्र पावसाळ्यापूर्वीपासून कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसराती अनेक इमारतींना अतिशय कमी पाणीपुरवठा होत आहे.

हेही वाचा : मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे महारेरा नोंदणी करणाऱ्या ५२ विकासकांना दणका

ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये सुमारे १३५ गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी साधारण १२० इमारतींना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून या इमारतींमधील रहिवाशांचा ५० टक्के कमी पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आर-दक्षिण विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त, जल विभागातील अधिकारी, अभियंत्यांकडे वारंवार तक्रार करण्यात आली. मात्र महानगरपालिकेला हा प्रश्न सोडविता आलेला नाही. त्यामुळे या रहिवाशांना नाईलाजाने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे, अशी खंत ठाकूर कॉम्प्लेक्स रेसिडन्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय जयस्वाल यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : अंबानी कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी बिहारमधून एकजण ताब्यात

बरखा बहार सोसायटीला पूर्वी दररोज साधारण २८ हजार लिटर पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिवसभर पाणी पुरत होते. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून केवळ १३ हजार लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सोसायटीचा पाणीपुरवठा दुपारी किंवा रात्री बंद करावा लागत आहे. सोसायटीतील रहिवाशांना गरजेपुरते पाणी पुरत नाही. त्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागत आहे. दर महिन्याला साधारण २५ हजार रुपये खर्च टँकरच्या पाण्यासाठी करावा लागत आहे. तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते सोसायटीत तपासणीसाठी येऊन गेले. मात्र समस्या जैसे थे आहे, असे बरखा बहाल सोसायटीतील रहिवासी दिनेश चपळकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tankers to residents of kandivali despite heavy rainfall mumbai print news tmb 01
First published on: 06-10-2022 at 14:00 IST