मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या (डब्ल्यूडीएफसी) तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे लोकार्पण करण्यात आले. न्यू संजण-न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव – न्यू सफाळे आणि न्यू सफाळे – न्यू जेएनपीटी हे टप्पे सुरू झाल्याने जेएनपीटीला प्रथमच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची एंड-टू-एंड जोडणी मिळाली आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने मुख्य रेल्वे मार्गावरील कोंडी कमी होऊन लोकल, मेल आणि एक्स्प्रेसचा वेग व वक्तशीरपणा सुधारण्यास मोठी मदत होईल. तसेच भविष्यात वाढवण बंदराला डीएफसी मार्ग जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराला भविष्यात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नेटवर्कशी जोडण्यात येणार आहे. पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणाऱ्या वाढवण बंदरातून मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहतूक अपेक्षित असल्याने त्यासाठी स्वतंत्र रेल्वे जोडणीचे नियोजन करण्यात येत आहे. वाढवणमधील एका स्थानकाद्वारे हा कॉरिडॉर जोडण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे बंदरातील माल थेट देशाच्या विविध भागांमध्ये जलदगतीने पोहोचवता येईल. सुमारे ७६ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ मालवाहतूकच वेगवान होणार नाही, तर मुंबईसह देशातील प्रवासी रेल्वे व्यवस्थेलाही दीर्घकालीन दिलासा मिळेल, अशी माहिती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी दिली.

दादरी – जेएनपीटी दरम्यानचा १,५०४ किमीचा विद्युतीकृत दुहेरी मार्ग आता कार्यान्वित झाला आहे. या मार्गावर दुहेरी कंटेनर (डबल-स्टॅक) मालगाड्या चालवणे शक्य झाले असून, भारत विद्युतीकृत मार्गावर लांब पल्ल्याच्या डबल-स्टॅक मालगाड्या चालवणारा जगातील एकमेव देश ठरला आहे. डीएफसीची जोडणी होण्यापूर्वी जेएनपीटीमध्ये सुमारे १५ हजार कंटेनर अडकून राहत होते. मात्र स्वतंत्र मालवाहतूक मार्ग उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबितता सुमारे दोन हजारांवर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कंटेनरची जलद वाहतूक, बंदरातील वाहतूक सुरळीत होणे आणि उद्योगांना वेळेत माल पोहोचवणे अधिक सुलभ झाले आहे.

१.५ किमी लांबीच्या गाडीत २५० कंटेनर

डीएफसीवर सुमारे दीड किमी लांबीच्या मालगाड्या एका वेळी २५० कंटेनर घेऊन धावू शकतात. कंटेनरवर कंटेनर रचून (डबल-स्टॅक) वाहतूक होत असल्याने मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या या कॉरिडॉरवर दररोज सुमारे ४३० मालगाड्या चालवल्या जात असून, भविष्यात क्षमता आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे.

प्रवासी रेल्वेला थेट फायदा

आतापर्यंत अनेक मार्गांवर मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच लोहमार्गावर धावत असल्याने वारंवार विलंब होत होता. मालगाड्या डीएफसीवर वळवल्याने मुख्य मार्गावरील ताण कमी झाला आहे. प्रयागराज आणि उत्तर मध्य रेल्वे विभागात डीएफसी सुरू झाल्यानंतर प्रवासी रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा ४५ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. त्याच धर्तीवर मुंबई विभागातही लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि वंदे भारतसारख्या गाड्यांचा वेग वाढवणे तसेच भविष्यात अधिक फेऱ्या चालवणे शक्य होईल, असे प्रवीण कुमार यांनी सांगितले.

मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कला चालना

डीएफसीच्या माध्यमातून विविध ठिकाणी मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्क विकसित केले जात असून, रेल्वे, रस्ता आणि बंदर यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे. देशातील लॉजिस्टिक खर्च कमी करून तो सुमारे ७ ते ८ टक्क्यांपर्यंत आणण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच रस्त्यावरून होणाऱ्या मालवाहतुकीपैकी अधिक वाटा रेल्वेकडे वळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.