शेवटपर्यंत लढा देऊन मराठा बांधवांनी आरक्षण मिळवलं ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. आंदोलकांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या आहेत त्या त्वरित मागे घ्या, तसेच ज्यांना बनावट गुन्ह्यांखाली अटक केली आहे त्यांची सुटका करण्यात येईल याचीही शाश्वती देतो अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच शिवसेना तुमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे हे आरक्षण कोर्टातही टिकेल यात शंकाच नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मराठा बांधवांनी ज्या प्रकारे आरक्षणासाठी लढा दिला ती बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेवला आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली.

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. काही वेळापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठा बांधवांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीनंतर मराठा बांधवांनी उपोषण मागे घेतले आहे.

मराठा संघटनांनी केलेल्या व्यापक आंदोलनामुळेच मराठा आरक्षणाचा निर्णय झाला. मराठा आरक्षण कोर्टात टिकणार की नाही असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. आरक्षण कोर्टात टिकेल आणि टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या आंदोलकांना या आंदोलनादरम्यान प्राण गमवावे लागले त्या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले असून मराठा बांधवांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे असेही स्पष्ट केले.