‘आम्ही तुमच्या सोबत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली

We are with you dont worry the Chief Minister reassured the Lonakar family
उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे. तर, राज्यभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्निलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वन केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- Video : “…पण आता आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये”; स्वप्निलची इच्छा राहिली अपूर्णच

याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे उपस्थित होते.

हेही वाचा- स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

आम्ही सगळे तुमच्या सोबतच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: We are with you dont worry the chief minister reassured the lonakar family srk

ताज्या बातम्या