मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. दळवी हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते होते. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.
महायुती सत्तेत आल्यानंतर आम्ही मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले, मुंबईचे रस्ते धुतले मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी केली.
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.
दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंचांनीही यावेळी पक्षप्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत ठाकरे यांच्या गटातून ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
माझ्या मुलाला कुठेतरी ॲडजस्ट करा
माजी महापौर दत्ता दळवी यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. यावेळी ते म्हणाले की मी कोणत्याही शंकाकुशंका घेऊन प्रवेश केला नाही. तर समस्यांचे ओझे घेऊन आलो आहे. विक्रोळीतील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्याल अशी अपेक्षा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे व्यक्त केल्या. लोकांना काहीतरी देण्यासाठी मी खऱ्या शिवसेनेत आलो. मला काहीतरी घेण्यासाठी नाही आलो. माझा मुलगा आहे, त्याला राजकारणात रस आहे तो काम करू शकतो. त्याला कुठेतरी ॲडजस्ट कराल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.