टोल नाक्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य नेहमीच हैराण होतात, पण आमदारांनाच त्याचा फटका बसल्याने त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली. अर्थात, टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने कोणतेच ठोस उपाय सुचविले नाहीत, फक्त आमदारांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, व सर्व टोल नाक्यांवर तशा सूचना दिल्या जातील असे आश्वासन शुक्रवारी विधान परिषदेत देण्यात आले.
खासदार-आमदार मंडळींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. ही सवलत आता माजी आमदारांनाही लागू करण्यात आली. तरीही टोल नाक्यांवर आमदार मंडळींकडे टोलची मागणी केली जात असल्याने आमदार मंडळींमध्ये संतापाची भावना असते व त्याचा उद्रेक विधान परिषदेत झाला. पुणे-सातारा मार्गावर आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांची गाडी अडविण्यात आली. त्यांनी आपण आमदार असल्याचे सांगत ओळखपत्र दाखविले, पण हा ‘रिलायन्स’ कंपनीचा टोल नाका आहे, आम्ही आमदारांना ओळखत नाही, असे दरडावण्यात आल्याने गाडगीळ यांनी टोल भरला. ही बाब निरंजन डावखरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणताच सारेच सदस्य आक्रमक झाले. अलीकडेच वाशी टोल नाक्यावर आपल्याला स्वत:च्या वाहनातून प्रवास करता म्हणून टोल माफी मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याचे स्वत: गाडगीळ यांनी सांगताच सदस्यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
आमदारांचे ओळखपत्र मागितले जाते, अशी काही सदस्यांची तक्रार होती. तर ओळखपत्र स्कॅन करावे लागेल, असे उद्धटपणे सांगण्यात येते, असाही काही सदस्यांचा आक्षेप होता. गावातील ओवाळून टाकलेली मुले या टोल वसुलीचे काम करतात, असे दीपक साळुंखे (राष्ट्रवादी) यांनी सांगितले. टोल नाक्यांवर गर्दीत थांबावे लागते, अशी आमदारांची तक्रार होती. आमदारांच्या ओळखपत्राची माहिती साऱ्या टोल नाक्यांवर देण्यात यावी, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली.
आमदारांच्या तक्रारींची दखल घेत साऱ्या टोल नाक्यांवर तशा सूचना दिल्या जातील, मात्र, टोल नाक्यावर मागणी केल्यास आमदारास त्याचे ओळखपत्र दाखवावे लागेल, असे बांधकाममंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.  

आमदारांना असाच त्रास होवो!
महाराष्ट्रातील टोलसंस्कृतीला लागलेल्या गुंडगिरीची कटूफळे आजवर केवळ सर्वसामान्यांच्याच वाटय़ाला येत असत. सर्वसामान्य वाहनचालकांचा अवमान करणे, प्रसंगी त्यांना दमदाटीच नव्हे, तर मारहाण करणे mu02असे प्रकारही विविध टोलनाक्यांवर घडले आहेत. सरकारने विविध पदांना टोलमधून सवलत जाहीर केली असून, त्यात आमदार-खासदारांप्रमाणेच लष्करी सेवेतील अधिकाऱ्यांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. परंतु त्यांनाही हे ‘टोलभैरव’ जुमानत नसल्याचा अनुभव आहे. त्यांना सवलत द्यावी की देऊ नये हा वेगळा मुद्दा. परंतु ती दिली असेल तर टोलनाक्यांवर त्याचे पालन झालेच पाहिजे. त्यातून कोणत्याही कंपनीला, मग ती ‘रिलायन्स’ असली तरी, सुटका मिळता कामा नये. मात्र टोलनाक्यांवरील गुंडगिरीची झळ आमदारांना बसली हे एकापरी बरेच झाले. विधिमंडळात या विषयावर झडलेली चर्चा आणि सरकारने त्याची घेतलेली दखल हे सर्व पाहता, यापुढेही आमदारांना वेळोवेळी वेगवेगळय़ा क्षेत्रात असाच त्रास होवो, म्हणजे त्यानिमित्ताने तरी त्यांना सर्वसामान्यांना रोजच्या जगण्यात कोणती दिव्ये करावी लागतात हे समजेल.

अनोखे आंदोलन
पिंपळगाव :  पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर मुजोर सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी एका बस चालकाला मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ टोलनाक्यावर जमलेल्या चालकांनी सर्व बसेस टोल नाक्यावर उभ्या करत आंदोलन केले. तासभराच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.