आम्हाला खडसेंचा केवळ राजीनामा नकोय. तर लवकरात लवकर आणि निश्चित कालावधीत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. हीच आमची मागणी आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी स्पष्ट केले. अंजली दमानिया यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. त्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली.
निश्चित कालावधीत एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाईल हे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण आंदोलनाबाबत माघार घेणार नसल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे. अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. खडसे यांच्याविषयी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे दमानिया यांनी हजारे यांना दाखवली. या कागदपत्रांचा मोठा गठ्ठाच त्यांनी येथे आणला होता. त्याच्या प्रती त्यांनी हजारे यांना दिल्या. त्यावर अभ्यास करण्याचे आश्वासन हजारे यांनी दिले आहे.