“मी दहीहंडी साजरी करू नये, म्हणून ठाकरे सरकारने शेकडो पोलिसांना माझ्या घरी पाठवले ! हिंदू धर्म हज़ारो वर्षांचा नाही तर लाखों वर्षांचा आहे, म्हणूनच आपण त्याला सनातन धर्म म्हणतो. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही.!” असा इशारा भाजपा नेते आमदार राम कदम यांनी आज ठाकरे सरकारला दिला आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केलेले आहे. यामुळे भाजपा व मनसेने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जेव्हा अन्य धर्माच्या लोकांनी ठाकरे सरकारला सण साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. कोणती अशी कारणं होती की अर्ध्या रात्री मंत्रालय उघडल्या गेलं. आम्ही तर केवळ सांगतोय की पाच जणांना परवानगी द्या. पाच जणांच्या वर एकही व्यक्ती येणार नाही. ते पाचही जण सरकारला दोन्ही लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र दाखवतील. सहावा व्यक्ती जर आला तर तुम्ही आम्हाला बोला.”

तसेच, “आता अशा प्रकारच्या परंपरेनुसार विधी विधानानुसार… हिंदू धर्म हजारो वर्षे जुना नाही तर लाखो वर्षे जुना आहे. म्हणून त्याला सनातन म्हटलं जातं. ही सनातन धर्माची परंपरा आहे, ती आम्ही कदापि खंडित होऊ देणार नाही. ठाकरे सरकार जर पोलीस बळाचा गैरवापर करत असेल, त्यानंतरही आम्ही घाटकोपरला जाऊ आणि दंहीहंडीचा हा उत्सव साजरा करू.” असं देखील यावेळी राम कदम यांनी बोलून दाखलं आहे.

दहीहंडीसाठी भाजप, मनसे आक्रमक

तर, दहीहंडीनिमित्त मानवी मनोरे उभारू नयेत, अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने सोमवारी केलेली आहे. मात्र, ही सूचना प्रसृत करण्यात झालेला विलंब आणि त्यातील अस्पष्टतेमुळे पोलिसांना मात्र कायदा व सुव्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.