मुंबई : काही दिवसांपूर्वी मुलुंड परिसरात सापडलेल्या एका अशक्त सोनेरी कोल्ह्याला जीवदान देण्यात वन विभाग, तसेच ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) संस्थेला यश आले होते. प्राथमिक तपासणीत कोल्हा निर्जलीकरमामुळे अशक्त झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. वैद्यकीय उपचारादरम्यान दोन दिवसापूर्वी या कोल्ह्याचा मृत्यू झाला.

मुलुंड (पूर्व) येथील नवघरमधील एका गृहसंकुलाच्या परिसरात एक अशक्त सोनेरी कोल्हा आढळला होता. वनविभागाच्या पथकाने ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) संस्थेच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. वनविभागाच्या समन्वयाने ‘रॉ’ संस्था त्याच्यावर उपचार करीत होती. दरम्यान, दोन दिवसापूर्वी कोल्ह्याचा मृत्यू झाला. कोल्ह्याच्या शवविच्छेदन अहवालातून निर्जलीकरणामुळे, तसेच त्याला मोटारगाडीचा जोरात मार बसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कोल्ह्याचा मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मुलुंड येथील गृहसंकुलातील एका मोटारगाडीखाली सोनेरी कोल्हा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने गाडीखालून बाहेर काढले. हा कोल्हा पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून गृहसंकुलात आल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. कदाचित तेव्हा कोल्हा गाडीवर आदळला असावा आणि त्याला जबरदस्त मार बसला असावा. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई महानगर प्रदेशातील वन्यजीवांच्या नष्ट झालेल्या अधिवासाकडे लक्ष वेधले आहे. तसेच यामुळे मानव – वन्यजीव संघर्षाची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. अधिवास नष्ट होणे, भटके श्वान, तसेच रस्त्यावरील अपघात यामुळे या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रेबजची लागण नाही

यापूर्वी चेंबूर परिसरात रेबीजची लागण होऊन तीन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये आढळलेल्या कोल्ह्याची रेबीज चाचणीही करण्यात आली होती. मात्र, त्याला रेबीजची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात रेबीजची लागण होऊन एका सोनेरी कोल्ह्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच दोन सोनेरी कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता.

काही महिन्यांपूर्वी खारघरमध्ये मृत्यू

नवी मुंबईजवळील खारघर येथे काही महिन्यांपूर्वी सोनेरी कोल्हा मृतावस्थेत आढळला होता. नवी मुंबई परिसर पाणथळ जागा आणि कांदळवन क्षेत्रासाठी आळखला जातो. आजघडीला गर्दीने गजबजलेल्या नवी मुंबईत एकेकाळी घनदाट जंगल होते. असंख्य पशु-पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळत होत्या. कालांतराने येथे मनुश्यवस्ती वाढली, मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. असे असले तरी आजही तेथे काही वन्यप्रजाती वाढत असून या वन्यप्रजाती शहरीकरणाला तोंड देत तग धरून आहेत. त्यापैकीच एक दुर्मिळ सोनेरी कोल्हा. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. आजही नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हे आढळतात. कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे.

संवर्धन, संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव

सोनेरी कोल्हा हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे. याबाबत अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही किंवा त्याच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पर्यावरण अभ्यासकांनी वन्यजीव सुरक्षेसाठी विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रारीही केल्या आहेत.