मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सध्या मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत आहे. पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

शहरात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यानंतर आता राज्यात काही ठिकाणी पावसाळी हवामान असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. सध्या मुंबईत किमान तापमानात वाढ नोंदली जात आहे. हवामान विभागाने मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात ३६.६ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. जे सामान्य तापमानाहून २ ते ३ अंश सेल्सिअस अधिक आहे.

मंगळवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २५.७अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २४. ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या किमान तपामानातही वाढ झाली आहे. सध्या शहर आणि उपनगरात जोरदार वाऱ्यांची नोंद होत असली तरीही नगरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.

संध्याकाळच्या वेळी वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दुपारच्या तुलनेत नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

‘यलो अलर्ट’ कुठे?

धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर आदी भागातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

उष्ण आणि दमट हवामान कुठे?

मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे आणि रायगड येथे उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत आहे. दरम्यान, बुधवारीही ठाणे, मुंबई, आणि रागयड भागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल तर किमान तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.