समाजकल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळू शकणार
नर्सिगच्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
समाजकल्याण विभागाकडून कमीतकमी २ लाख ५० हजार उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी समाजकल्याण विभागाकडून ‘पोस्ट मॅट्रिक टय़ुशन फी अॅण्ड एक्झामिनेशन फी’ या नावाने शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावरून अर्ज भरला जातो. मात्र नर्सिग अभ्यासक्रमाबाबत संकेतस्थळावर चुकीची माहिती असल्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात गेले ५ महिने हिंदुजा महाविद्यालयाच्या अदिती आंबेरकर यांना अडचणी येत होत्या. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ९ मार्चला छापले होते.
त्यानंतर समाजकल्याण खात्याने संकेतस्थळावरील चुकीची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचा अर्ज संकेतस्थळावर स्वीकारला गेला असल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली. त्यांना आता नर्सिगसाठी भरलेले १ लाख ४ हजार ५०० रुपये शुल्क परत मिळू शकणार आहेत.