scorecardresearch

आठवडय़ाची मुलाखत : अचूक पूर्वानुमानासाठी..

भारतीय हवामान विभागाचा १४ जानेवारी रोजी १४७ वा स्थापना दिवस होता. याच मुहूर्तावर गोरेगावमधील वेरावली येथे मुंबईतील दुसरे ‘डॉप्लर रडार’ कार्यान्वित करण्यात आले.

सुनील कांबळे प्रभारी संचालक,  हवामान विभाग, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारतीय हवामान विभागाचा १४ जानेवारी रोजी १४७ वा स्थापना दिवस होता. याच मुहूर्तावर गोरेगावमधील वेरावली येथे मुंबईतील दुसरे ‘डॉप्लर रडार’ कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतील पाऊस, वादळे, विजांचा कडकडाट इत्यादी वातावरणीय घटनांबाबतचे पूर्वानुमान अधिक अचूकरीत्या वर्तवता येणार आहे. यानिमित्ताने ‘डॉप्लर रडार’ ही संकल्पना आणि त्याचा वापर याविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांच्याशी साधलेला संवाद.

  •   रडार ही संकल्पना काय आहे? भारतात रडारद्वारे वातावरणाचे पूर्वानुमान देण्याची पद्धत कधी सुरू झाली ?

 युरोपात दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत आकाशातील विमाने हेरण्यासाठी रडार वापरले जात होते. त्या वेळी रडारमधून ढगांची स्थिती दिसत असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊ शकेल अशा रडारची निर्मिती करण्यात आली. १९६० साली भारतात ‘कन्व्हेन्शनल रडार’चा वापर सुरू झाला. यातून फक्त ढगांची स्थिती दिसू शकत होती. सध्या वापरात असलेल्या ‘डॉप्लर रडार’मधून ढगांची स्थिती, त्यांतील पाण्याचे प्रमाण, वाऱ्याची गती, इत्यादी अनेक वातावरणीय घडामोडींचे पूर्वानुमान करता येते. रडार म्हणजे ‘रेडिओ डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग’. रडार २४ तास कार्यान्वित असते. त्याचा अ‍ॅण्टेना ३६० अंशात फिरून वातावरणाचे निरीक्षण करतो. यातून दर १० मिनिटांनी नोंदी प्राप्त होतात.

  •   डॉप्लर रडारचे प्रकार कोणते ?

 रडारचे ‘सी बॅण्ड’, ‘एस बॅण्ड’ आणि ‘एक्स बॅण्ड’ असे तीन प्रकार असतात. एक्स बॅण्ड रडार १०० किमीपर्यंतच्या क्षेत्रातील वातावरणाचे निरीक्षण करते. सी बॅण्ड रडार ४५० किमीपर्यंतच्या क्षेत्रातील वातावरणाचे पूर्वानुमान देते. एस बॅण्ड रडार हे ५०० किमीपर्यंतच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते.

  •    कुलाब्याचे रडार आणि गोरेगावचे रडार यात फरक काय आहे ?

 कुलाब्याचे रडार हे ‘एस बॅण्ड’ प्रकारचे रडार आहे. याचा वापर प्रामुख्याने अरबी समुद्रावरील चक्रीवादळाचे पूर्वानुमान करण्यासाठी होतो. गोरेगावचे रडार ‘सी बॅण्ड’चे आहे. शिवाय हे तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत आहे. या रडारमुळे ढगांची हालचाल, त्यांतील पाण्याचे प्रमाण, ढग कोणत्या दिशेला जात आहेत, इत्यादी गोष्टी समजू शकतील. 

  •    मुंबईला दुसऱ्या रडारची गरज का भासली ?

 मुंबईत २००५ साली आलेल्या जलप्रलयानंतर दुसऱ्या रडारची गरज जाणवली. एक रडार बंद पडले तर दुसरे रडार पूरक ठरू शकेल; मात्र रडार बसविण्यासाठी भोवतालचा प्रदेश मोकळा असावा लागतो. रडारसाठी पालिकेतर्फे गोरेगावमधील वेरावली येथील जागा उपलब्ध झाली. रडार जेथे बसविले जाते तेथे भोवतालच्या प्रदेशात बांधकामांवर काही निर्बंध असतात; मात्र मुंबईसाठी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

  •    तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी कुलाब्याचे रडार बंद का पडले होते ?

 काही तांत्रिक कारणास्तव ते बंद पडले होते. रडारचे आयुष्य १५ वर्षे असते. कुलाब्याचे रडार १० वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. देखभाल दुरुस्ती करून त्याचे आयुष्य वाढवता येऊ शकते.

  •    रडार बंद पडल्यास कोणत्या अडचणी येऊ शकतात?

 वातावरणाचे पूर्वानुमान देण्यासाठी जी अनेक साधने वापरली जातात त्यापैकीच एक रडार. कृत्रिम उपग्रहाद्वारेही ढगांची स्थिती कळू शकते; मात्र कृत्रिम उपग्रह हजारो किलोमीटर अंतरावरून ढगांचे निरीक्षण करत असतो. तर, रडार शेकडो किमी अंतरावरून निरीक्षण करीत असते. फुगे हवेत सोडूनही वातावरणाचा अंदाज घेतला जातो. रडारमुळे पूर्वानुमानाची अचूकता वाढते.

मुलाखत : नमिता धुरी

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weekly interview accurate forecast ysh