गडचिरोलीत सुसज्ज रुग्णालय; विमानतळाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

यावेळी या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ज्ञ डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे  आदेश अजित पवार यांनी दिले.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई:  नक्षलग्रस्त  गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून उपस्थित होते,  तर  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव (नियोजन)  नितीन गद्रे, प्रधान सचिव (नागरी विमान) वल्सा नायर,  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ज्ञ डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे  आदेश अजित पवार यांनी दिले. त्याबरोबर जिल्ह्यात जलद ये-जा करता यावी तसेच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली -कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

 पालकमंत्री शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणि त्यात जखमी होणाऱ्या पोलिसांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दीडशे खाटांचे सामान्य रुग्णालय उभारून त्यातील ५० खाटा या ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.        

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Well equipped hospital gadchiroli deputy cm orders speeding work airport ysh

Next Story
‘एमएसईडीसीएल’च्या अभियंत्याला मारहाण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी