प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा |well maintained st bus now at passenger service plan for cleanliness depots and bus stations mumbai | Loksatta

मुंबई: प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा

रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस, बसस्थानके व परिसर स्वच्छ असेल त्याचबरोबर बसस्थानकातील प्रसाधनगृहे स्वच्छ व निर्जंतुक असतील, यांवर भर दिला जाणार आहे.

मुंबई: प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

धुळीने माखलेला बसचा आंतर-बाह्यभाग, मोडकी आसने, फुटलेल्या खिडक्या, बस स्थानक आणि आगारात अस्वछता असे चित्र गेली अनेक वर्षे एसटी स्थानकांत दिसते. मात्र हे चित्र आता बदलण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस, बसस्थानके व परिसर स्वच्छ असेल त्याचबरोबर बसस्थानकातील प्रसाधनगृहे स्वच्छ व निर्जंतुक असतील, यांवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी महामंडळाने कृती आराखडा तयार केला असून स्वच्छतेसाठी पंचसूत्री अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बसेस, बसस्थानक व परिसर तसेच प्रसाधनगृहे स्वच्छ व टापटीप ठेवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे पोलिसांनी केलेले नियोजन अयशस्वी; ये-जा करण्याचे मुख्य मार्गच बंद

स्वच्छतेचे आगारनिहाय नियोजन करण्यात येत असून, जेथे महामंडळाचे सफाई कर्मचारी नाहीत, तेथे स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी कामगार नेमून स्वच्छता करून घ्यावी. गरज पडल्यास निविदा प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता करण्यासाठी संस्था नेमण्यात यावी. ज्या आगारात स्वयंचलित बस धुलाई यंत्रे नाहीत, तेथे नव्याने धुलाई यंत्र बसवण्यात यावीत अशा सूचना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा: “शिंदे गट आणि भाजपानं शेपटी…”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

बसेस आणि स्थानकांच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्री अवलंबण्यात येणार असून त्यात बसेसची अंतर्बाह्य स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक असाव्यात, मोडक्या खिडक्या त्वरित बदलून घ्याव्यात, गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी, फाटलेली आसने तातडीने दुरुस्ती करून घ्यावीत, बसचा रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी अशा सुचनांचा समावेश आहे. सध्या राज्यात १६ हजार गाड्या, २५० आगार आणि ५६७ बस स्थानके आहेत. बस गाड्यांमध्ये साध्या प्रकारातील बस, शिवशाही, अश्वमेध, शिवनेरी, शिवाई बस आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:21 IST
Next Story
मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल