मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १ मे २०२६ पासून विद्यमान १२ डब्यांच्या १७ साध्या लोकल गाड्यांचे १५ डब्यांच्या सेवांमध्ये रूपांतर करून चालविण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारपासून पहिल्यांदाच विरार – डहाणूदरम्यान १५ डब्यांच्या लोकल धावल्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गर्दीपासून काहीशी सुटका झाली आहे. तसेच १२ अतिरिक्त वातानुकूलित लोकल सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेने हार्बर मार्गांवर वातानुकूलित लोकलच्या जादा १४ फेऱ्या चालविण्यास सुरुवात केल्याने वाढत्या उन्हापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.
किफायतशीर दर आणि वेगवान प्रवासासाठी मुंबईकर लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परिणामी, लोकलला नेहमीच गर्दी असते. वाढत्या गर्दीला समावून घेण्यासाठी रेल्वेने १५ डब्याच्या लोकलची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे १५ डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या २२७ वरून २४४ पर्यंत वाढली आहे.
विशेष म्हणजे, विरार – डहाणू रोड मार्गावर प्रथमच १५ डब्यांची लोकल सेवा सुरू झाली असून, या मार्गावरील प्रवाशांना अधिक क्षमतेच्या गाड्यांचा फायदा होणार आहे. या १७ गाड्यांपैकी ८ सेवा प्रथमच विरार – डहाणू रोडदरम्यान धावणार आहेत. परिचालनाच्या कारणास्तव काही १५ डब्यांच्या लोकल गाड्यांना दोन्ही दिशांनी ग्रॅन्ट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबा दिलेला नाही. तसेच, या गाड्यांना दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर ‘दुहेरी थांबा’ (डबल हॉल्ट) देण्यात आला आहे.
१२ नव्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची भर
१२ नव्या वातानुकूलित लोकलमुळे गाड्यांची संख्या वाढली आहे. कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) वातानुकूलित लोकल सेवांची संख्या १३३ वरून १४५ पर्यंत, तर सुट्टीच्या दिवशी (शनिवार -रविवार) १०६ वरून ११८ पर्यंत वाढली आहे. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या १२ डब्यांच्या साध्या लोकलच्या जागी चालवण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व बदलांनंतरही पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांच्या एकूण संख्येत कोणताही बदल झालेला नाही.
१२ नव्या एसी लोकलचे वेळापत्रक
अप मार्ग-
सकाळी ५.२५ ची भाईंदर -चर्चगेट लोकल जलद
सकाळी ८.२८ ची विरार-चर्चगेट लोकल जलद
सकाळी १०.५० ची बोरीवली-चर्चगेट लोकल जलद
सायंकाळी ६.३२ ची मालाड-चर्चगेट लोकल जलद
रात्री ८.२५ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी रात्री १०.५८ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी
डाउन मार्ग- सकाळी ७.०३ ची चर्चगेट-विरार लोकल जलद
सकाळी ९.५६ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद
सकाळी ११.५१ ची चर्चगेट-मालाड लोकल जलद
सायंकाळी ७.२५ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद
रात्री ९.३९ ची चर्चगेट-बोरीवली लोकल धीमी
रात्री १२.१३ ची चर्चगेट- भाईंदर लोकल धीमी
हार्बर मार्गावर आणखी १४ नवीन वातानुकूलित लोकल
मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा देत आणखी १४ नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या मार्गावर १ मेपासून या फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. नव्या १४ फेऱ्यांची भर पडल्याने वातानुकूलित लोकलची एकूण संख्या २८ झाली आहे. हार्बर मार्गावर दररोज सरासरी ४,५०० तिकिटांची विक्री होत असून, पासधारकांसह सुमारे ४० हजार प्रवासी वातानुकूलित लोकलने प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात वातानुकूलित लोकल असून, त्यांच्यामार्फत दररोज ९४ फेऱ्या होतात. हार्बर मार्गावरील नव्या फेऱ्यांमुळे एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या १०८ झाली आहे.
