मुंबई : पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे भारतात विशेषत: उत्तरेच्या राज्यांत मुसळधार पावसाची नोंद होत असून राज्यातील अनेक भागातही पावसाची नोंद होत आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि वायव्य भारतावर १ हजार किमी लांबीच्या ढगांचा पट्टा दिसून आला. भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या प्रतिमांनुसार देशातील काही भागांत तीव्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पूर्व इराण आणि अफगाणिस्तान या देशांवर गुरुवारपासून पश्चिमी विक्षोभ सक्रिय असून राजस्थानमधील पूर्व भागातील काही ठिकाणी तुफान वादळी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारीही राजस्थानमधील जयपूर येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची नोंद झाली. तर राजधानी दिल्लीतही पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवस दिल्लीतील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि
पूर्व राजस्थान आदी भागांत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान स्थितीत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
या राज्यांना हवामान विभागाचा इशारा
सध्या कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकत असून यामुळे भारतातील उत्तरेच्या राज्यांना याचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे जोरदार वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कमी दाबाचा पट्टा शनिवारी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यांपर्यंत सरकण्याची शक्यता आहे.
यामुळे दिल्लीसह अनेक भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या सर्व राज्यांत ८ एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर ७ एप्रिलपासून पुन्हा पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव भारताच्या वायव्य भागावर राहणार आहे.
राज्यातील स्थिती काय ?
राज्यात पावसाळी हवामान कायम असले तरीही पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ६ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. यात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांचा समावेश आहे.
