मुंबई : जैवविविधतेच्या बाबतील समृद्ध मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाट प्रदेशातील पाच राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ड्रगनफ्लाय (चतुर ) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) कीटक प्रजातींच्या एकूण प्रजातींपैकी केवळ ६५ टक्केच प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या कीटकांच्या ज्ञान प्रजातींच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे नुकताच करण्यात आलेल्या एक संशोधनातून समोर आले आहे.
पुणे येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि केरळ येथील सोसायटी फॉर ओडोनेट यांच्या सहकार्याने पश्चिम घाटातील ओडोनाटा प्रजातींवर सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी पश्चिम घाट प्रदेशातील एकूण पाच राज्यांपैकी १४४ ठिकाणे निवडण्यात आली होती. या ठिकाणांतील ओडोनाटा अर्थात चतुर आणि टाचणीच्या विविध प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्या. हे सर्वेक्षण फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले.
नुकताच या सर्वेक्षणावरील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात संशोधक चमूकडून ओडोनाटा कीटकांच्या १४३ विविध प्रजातींची नोंद केली आहे. यात वैशिष्ट्यपूर्ण अशा ४० प्रजातींचा समावेश आहे. मात्र, संशोधन अहवालानुसार, पश्चिम घाटातील या प्रजातींच्या एकूण ऐतिहासिक नोंदींनुसार ही संख्या केवळ ६५ टक्केच आहे. या नोंदींमध्ये झालेली घट आणि नैसर्गिक अधिवासांचा होणार ऱ्हास याबाबतही संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
ओडोनोटा प्रजाती पर्यावरणासाठी महत्वाच्या का ?
ओडोनोटा या प्रजाती पर्यावरणीय बदलांबाबत अत्यंत संवेदनशील मानल्या जातात तसेच त्या गोड्या पाण्यातील परिसंस्थांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे गोड्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत अनुमान लावण्यास मदत होते. संशोधकांच्या मते, परिसंस्थावर असलेल्या ताणामुळे या प्रजातींमध्ये घट झाली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम घाटात सुरु असणारे विविध प्रकल्प, वाढते प्रदूषण तसेच पर्यटनावर निर्बंध नसणे, वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होणे आणि हवामान बदल यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होत आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रजातींची नोंद
या संशोधनात महाराष्ट्रात एकूण १०५ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १०० प्रजातींची नोंद करण्यात आली असून यात १२ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा समावेश आहे. तर केरळ येथे नोंद करण्यात आलेला ८३ प्रजातींपैकी ३३ प्रजाती या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कर्नाटक राज्यात १७ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. येथे ६४ प्रजातींची नोंद करण्यात आली असून यात ६ प्रजाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर गोवा राज्यात ३५ प्रजातींसह ४ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची नोंद झाली. तर गुजरात येथे १८ प्रजाती आढळून आल्या मात्र त्यात एकही वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीची नोंद झाली नाही, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सर्वेक्षणातून ओडोनाटा प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांचा ऱ्हास दिसून येत आहे. याबाबत अधिक सखोल संशोधनाची गरज असून या प्रजातींच्या अधिवासांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. – डॉ. पंकज कोपर्डे, सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
