मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. लोकलमध्ये असणारी गर्दी आणि उष्णता याचा विचार करता पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून वातानुकूलित लोकल १३३ करण्यात आल्या आहेत. तर, शनिवार आणि रविवारी १०६ वातानुकूलित लोकल धावतील.
मुंबईत पश्चिम रेल्वेवरून सर्वात पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ रोजी धावण्यास सुरुवात झाली. जानेवारी २०२० रोजी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरून पहिली वातानुकूलित लोकल धावली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली. तर, जानेवारी २०२२ मध्ये सीएसएमटी ते वाशी/ पनवेल आणि वांद्रे / गोरेगाव दरम्यान वातानुकूलित लोकल सेवा धावत होती.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेवरील ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करून १०९ लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. आता पश्चिम रेल्वेवर प्रशासनाकडून सोमवार ते शुक्रवार या काळात १३३ वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शनिवार आणि रविवारी १०६ वातानुकूलित लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह शनिवार आणि रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
यावर्षी अनेक लोकल वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर जानेवारीत १२ नव्या वातानुकूलित लोकल सुरू केल्या. फेब्रुवारीत आणखीन १२ नवीन वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
वातानुकूलित लोकल खूप चांगल्या सुविधा देतात. यासोबतच वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून सातत्याने सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दररोज कार्यालयीन कामकाजांसाठी जाणाऱ्या किंवा वैयक्तिक कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वातानुकूलित लोकलचा प्रवास हा आरामदायी आणि दिलासा देणारा ठरत आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
प्रवाशांची यात्री सुविधा वाढवणे आणि लोकल सुदृढ करण्याचे उद्दिष्ट १ फेब्रुवारी २०२६ पासून १२ डब्यांची ४ अतिरिक्त सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अतिरिक्त सेवा सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर एकूण १,४०६ लोकल फेऱ्यांऐवजी १,४१० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली.

