मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे. गारेगार आणि आरामदायी प्रवास मिळत असल्याने प्रवासी वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. परंतु, या लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वातानुकूलित लोकलमधून १.१६ लाखांहून अधिक प्रवाशांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून ३.७६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षी याच कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत यंदा जवळपास ९९ टक्के वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत काटेकोरपणे तिकीट तपासणी मोहिमा राबवून ३० लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून १९१ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला. वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ३.७६ कोटी रुपये दंड वसलू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यात वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील असताना प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास करण्याचे प्रमाण वाढत आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने संपूर्ण मार्गावर व्यापक आणि सातत्यपूर्ण तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. विनातिकीट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेचा बुडणार महसूल गोळा करणे, प्रवासातील शिस्त वाढवणे, तिकीटधारक प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या ३० लाखांहून अधिक प्रवाशांना पकडण्यात आले. तसेच नोंदणी न केलेले सामानही पकडण्यात आले. परिणामी, सुमारे १९१ कोटी रुपये दंड रुपात वसूल करण्यात आले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात जवळपास ४२ टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास/अनियमित प्रवाशांची ३ लाख प्रकरणे आढळली आणि १८.५० कोटी रुपयांहून
अधिक रक्कम वसूल करण्यात आली. जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक आहे. मुंबई उपनगरीय विभागात काटेकोरपणे राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमांमुळे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
मुंबई उपनगरीय विभागात फेब्रुवारी २०२६ मध्ये विनातिकीट / अनियमित प्रवासाची एकूण ८७ हजार प्रकरणे आढळली. त्यांच्याकडून ४.२८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. एकत्रितपणे, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई उपनगरीय विभागात १० लाख प्रकरणे आढळली आणि एकूण ५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
