मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्याच्या लोकलमध्ये रूपांतर केले आहे. सोमवारपासून १५ डब्यांच्या आणखी ६ फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आता १५ डब्यांच्या एकूण १५० फेऱ्या धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी १२ डब्यांच्या लोकलला आणखी तीन डबे जोडून १५ डब्यांची लोकल चालवण्यास सुरुवात केली. सोमवारपासून १६ डब्यांच्या ६ फेऱ्यांमधील ३ अप आणि ३ डाऊन मार्गावर धावतील, तर यापैकी दोन फेऱ्या जलद मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर धावतील. या सुविधेमुळे एका लोकल फेरीमधील २५ टक्के आसन क्षमता वाढणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. १५ डब्यांच्या ६ नवीन लोकल फेऱ्या विरार ते अंधेरी, नालासोपारा ते अंधेरी आणि विरार ते बोरिवलीदरम्यान धावणार असून विरार ते अंधेरी लोकल जलद मार्गावर धावणार आहे.
* जलद मार्गावरून विरारहून अंधेरीसाठी सकाळी ९.०५ वाजता लोकल सुटेल.
* धिम्या मार्गावरून नालासोपाऱ्याहून अंधेरीसाठी सायंकाळी ५.५३ वाजता लोकल सुटेल.
* धिम्या मार्गावरून विरारहून बोरिवलीसाठी सायंकाळी ७.५५ वाजता लोकल सुटेल.
* जलद मार्गावरून अंधेरीहून नालासोपाऱ्यासाठी सकाळी १०.१३ वाजता लोकल सुटेल.
* धिम्या मार्गावरून अंधेरीहून विरारसाठी सायंकाळी ६.५० वाजता लोकल सुटेल.
* धिम्या मार्गावरून बोरिवलीहून विरारसाठी रात्री ८.४० वाजता लोकल सुटेल.