मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन १३१ वर्षे जुना बेलासिस उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात आली. गुरुवारी हा उड्डाणपूल प्रवाशांसाठी सुरू केला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन वाहनधारकांना दिलासा मिळाला.

जुलै २०१८ रोजी मध्ये अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल कोसळला. त्यानंतर मुंबईतील सर्व पुलाचे आयआयटी मुंबईने ऑडिट केले असता, मुंबई सेंट्रल-ग्रॅंट रोड दरम्यानचा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर त्या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली. त्यानुसार हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

जून २०२४ मध्ये हा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभाग आणि मुंबई महानगरपालिकेद्वारे बेलासिस उड्डाणपुलाची पुनर्बांधणी केली. रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण केले. तर, गुरुवारी हा पूल प्रवाशांसाठी खुला केला.

धावत्या रुळांदरम्यान कोणतेही खांब येऊ नये, यासाठी ३६ मीटर लांबीचा आरडीएसओ मानक तुळया एकाच स्पॅनसह नवीन पूल नियोजितरित्या बांधण्यात आला. तसेच भविष्यात रुळांच्या रुंदीकरणाला सामावून घेण्यासाठी रेल्वे स्पॅनवर अतिरिक्त रुंदी ठेवण्यात आली आहे. रेल्वे स्पॅनच्या कामासाठी सुमारे २४.४९ कोटी रुपये खर्च लागला. ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रेल्वे स्पॅनचे विक्रमी कालावधीत काम करण्यात आले.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने अत्यंत सुरक्षितपणे या पुलाचे काम हाती घेतले. लोकल सेवेला कमीत कमी व्यत्यय येईल, यादृष्टीने कामे करण्यात आली. उड्डाणपुलाचे पाडकाम करताना आणि रेल्वे हद्दीतील बांधकाम लक्ष्यित वेळेत पूर्ण केली. त्यामुळे संपूर्ण पुलाचे काम लक्ष्यित वेळेच्या चार महिने आधी झाले, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.