मुंबई : कृत्रिम अभिव्यक्तीचा (एआय) वापर करून बनावट तिकिटे तयार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा घटना वाढत असल्याने, बनावट तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम पश्चिम रेल्वेने हाती घेतली आहे.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार दरम्यान नियमित तपासणी करताना जानेवारी २०२६ मध्ये तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एक बनावट यूटीएस लोकल पास पकडला. तिकीट तपासनीसाने बनावट तिकीट असल्याची पुष्टी केली. ज्यामुळे तिकीट फसवणुकीप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रवासी महिला प्रिती गुप्ता आणि तिचा अभियंता मित्र अनुज गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच इतर मार्गावरही असेच प्रकार घडले. त्यामुळे आता ऑनलाईन, ॲप तिकीट तपासण्यासाठी, पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासनीस यांना अधिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रभारी) प्रदीप कुमार यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रभारी) प्रदीप कुमार यांनी रविवारी चर्चगेट रेल्वे स्थानकावर ‘माय तिकीट, मेरी शान – विकसित भारतातील माझे योगदान’ या उपक्रमाला भेट दिली. यादरम्यान प्रवाशांना वैध तिकिटे आणि जबाबदार रेल्वे प्रवासाचे महत्त्व जाणून घेतले. खरेदी केलेले प्रत्येक तिकीट रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, प्रवासी सुविधा अद्ययावत आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी योगदान देते. रेल्वेचे सुरळीत कामकाज, रेल्वे मार्ग विस्तार आणि रेल्वेची सेवा सुधारणे यासंबंधीच्या प्रकल्पांसाठी तिकिटातून मिळणारा महसूल अत्यंत महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

रेल्वेची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरी जबाबदारीच्या भावनेला चालना देण्यासाठी तिकीट काढून प्रवास करणे आवश्यक आहे. प्रवाशांचे जबाबदार वर्तन भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना सामर्थ्य देते आणि विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत आहे. ज्यामध्ये प्रत्येक प्रवासी राष्ट्र उभारणीत सक्रिय भूमिका बजावतो. ‘माय तिकीट, मेरी शान – विकसित भारतातील माझे योगदान’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि इतरांना तसे करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सर्व प्रवाशांना वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन प्रदीप कुमार यांनी केले.

स्थानकांवर तिकीट खरेदी करणे सोपे आणि जलद होणार

पश्चिम रेल्वे स्थानकांवर सध्या ५०२ ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग (एटीव्हीएम) मशीन आहेत. परंतु, यातील अनेक मशीन नादुरुस्त आणि त्यांचा वापर करण्याचा कार्यकाळ संपल्याने, नवीन बसवण्यात येणार आहेत. सुमारे ३२५ नवीन अत्याधुनिक एटीव्हीएम मशीन पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकात बसवण्यात येणार आहेत.