मुंबई : पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमांमधून २७ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून १७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला. यात वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ३.५ कोटी रुपयांची दंडवसुली केली. तसेच महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले.

पश्चिम रेल्वे मार्गावर व्यापक आणि सातत्यपूर्ण तिकीट तपासणी मोहिमांद्वारे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू आहेत.

विनातिकीट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेचा बुडणार महसूल गोळा करणे प्रवासातील शिस्त वाढवणे, तिकीटधारक प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या सक्रीय देखरेखीखाली तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी मुंबई लोकल, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस आणि सुट्टीतील विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वारंवार तपासणी केली.

विनातिकिट प्रवासी किती?

एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत, विनातिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या २७ लाखांहून अधिक प्रवाशांना पकडण्यात आले. तसेच नोंदणी न केलेले सामानही पकडण्यात आले. परिणामी सुमारे १७२.५५ कोटी रुपयांची रक्कम वसूल झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ४७ टक्के वाढ झाल्याचे दिसते.

जानेवारी २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणारे २.८२ लाख प्रवासी आढळले आणि १७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली. जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३१ टक्के वाढल्याचे दिसते. मुंबई उपनगरीय विभागात, कडक तिकीट तपासणी मोहिमांमुळे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केल्याची माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.

लोकलमध्ये किती फुकट प्रवासी?

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई उपनगरीय लोकलमध्ये २०२६ मध्ये विनातिकीट प्रवासाची एकूण १.०२ लाख प्रकरणे आढळली. परिणामी ४.३४ कोटी रुपयांची रक्कम वसूल झाली. एकत्रितपणे, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत, मुंबई उपनगरीय विभागात ९.७५ लाख प्रकरणे आढळली आणि एकूण ४५.६० कोटी रुपये वसूल करण्यात आले. यात वातानुकूलित लोकल प्रवासातील विनातिकीट प्रवाशांना लावलेल्या दंडाची रक्कम समाविष्ट आहे.

उपनगरीय मार्गावर शिस्तबद्ध आणि अधिकृत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले. वातानुकूलित लोकलमध्येही लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवली. विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी वारंवार अचानक तपासणी करण्यात आली. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत, वातानुकूलित लोकल सेवांमध्ये एक लाखांहून अधिक दंडाची प्रकरणे नोंदवण्यात आली. परिणामी दंड म्हणून ३.३८ कोटी रुपयांची वसुली झाली. जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास ९७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने बनावट किंवा खोट्या यूटीएस तिकिटांवर प्रवास करण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी संयुक्त अंमलबजावणी मोहीम तीव्र केली आहे. अशाच एका मोहिमेदरम्यान, विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये, मुंबई सेंट्रलच्या मुख्य तिकीट निरीक्षक दीपिका मूर्ती यांच्या तिकीट तपासणी पथकाने फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले.

महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात, एका महिला प्रवाशाने तिच्या मोबाइलवर एक व्हर्च्युअल यूटीएस वातानुकूलित लोकल पास दाखवला. जो संशयास्पद वाटत होता. पडताळणी केल्यावर, तो पास यूटीएस प्रणालीद्वारे अधिकृतपणे दि ला नसल्याचे उघडकीस आले. त्या प्रवाशाला वांद्रे येथे उतरवण्यात आले. तेथे तिने कबूल केले की तो पास व्हॉट्सॲपद्वारे शेअर केलेल्या एका बनावट यूटीएस ॲप्लिकेशनचा वापर करून तयार केला होता. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या मदतीने, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.