मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल, उपाहारगृह आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर धडक कारवाई सुरू केली. तर, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आदिश पठानिया यांनी रेल्वे स्थानकांत ‘मुंढे पॅटर्न’ राबविला. गेल्या दहा दिवसांत धडक कारवाई करून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील ३९ खाद्यपदार्थ स्टाॅल बंद केले. रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व अस्वच्छता पसरवणाऱ्या खानपान स्टॉलवर पश्चिम रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई सुरू केली असून ३१ ऑगस्टपर्यंत नियमभंग करणाऱ्या स्टाॅलला टाळे ठोकले जातील.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानकांवरील कॅटरिंग युनिट्स व स्टाॅलची कसून पाहणी करण्यात आली असून, अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ३९ स्टॉलवर थेट बंदीची कारवाई करण्यात आली. यापैकी २० स्टॉलने सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर व दंडाची रक्कम भरल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या स्टाॅल्सकडून ३.८० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. उर्वरित १९ खाद्यपदार्थ व चहाचे स्टॉल अद्यापही बंद आहेत. हे स्टॉल्स २२ ते २४ ऑगस्ट २०२६ दरम्यान बंद करण्यात आले असून, नियमांची पूर्तता व तपासणी होईपर्यंत ते बंदच राहणार आहेत. हे स्टाॅल दादर, बोरिवली, वापी, वलसाड, सुरत या स्थानकांवरील आहेत.
सीएसएमटीवर शिळा व्हेज बर्गर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १४ जवळ असलेल्या ‘नमः वेटिंग लाउंज’च्या स्टॉलवर एका प्रवाशाला शिळा व्हेज बर्गर विकल्याचे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने या लाउंजसह खाद्यपदार्थ स्टॉल ३० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.
एका प्रवाशाने ‘नमः वेटिंग लाउंज स्टॉल’वरून ६० रुपयांचा व्हेज बर्गर खरेदी केला होता. बर्गर खाल्ल्यानंतर तो शिळा असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले व त्याला उलट्या होऊ लागल्या. प्रवाशाने तात्काळ स्टॉलवर जाऊन तक्रार केली असता, स्टॉलवरील विक्रेत्याने त्याला ६० रुपये परत केले. त्यानंतर प्रवाशाने रेल मदत मदतवाहिनी क्रमांक १३९ वर अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच मध्य रेल्वेच्या वाणिज्य निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. स्टॉलचालकाची चौकशी केली असता सकाळी ११ वाजता बनवलेला बर्गर सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत तसाच ठेवून प्रवाशाला विकण्यात आल्याचे समोर आले. बर्गर अनेक तास ठेवल्यामुळे शिळा झाल्याचे स्पष्ट झाले आणि प्रवाशाची तक्रार पूर्णपणे खरी असल्याचे निष्पन्न झाले. कचराकुंडीत टाकलेल्या त्या बर्गरची प्रत्यक्ष पाहणी केली असता, टोमॅटो आणि मेयोनिजमुळे त्याला दुर्गंधी येत असल्याचे आणि तो खराब झाल्याचे निष्पन्न झाले६.
अन्नाच्या दर्जाबाबत निष्काळजीपणा आढळल्याने सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अनिल जावडे यांनी मेसर्स नमः एंटरप्रायझेस संचालित वातानुकूलित प्रतीक्षालय आणि त्याचा खाद्यपदार्थ स्टॉल ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि भविष्यातही अशी मोहीम राबवली जाईल, असा इशारा मध्य रेल्वे प्रशासनाने दिला.
