मुंबई : पश्चिम रेल्वेवरील स्टाॅलवरून स्वच्छ आणि आरोग्यास सुरक्षित खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत का, नियमांचे पालन केले जात आहेत का, याची सखोल तपासणी केली जात आहे. अनेक स्टाॅलवरील कर्मचाऱ्यांकडे हातमोजे किंवा केसांची जाळी (हेअरनेट) दिसून आली नाही. त्यामुळे हातमोजे व केसांची जाळी घालणे बंधनकारक केले असून, पश्चिम रेल्वेचे स्टाॅलधारकांना लाल रंगाचा गणवेश लागू करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व अस्वच्छता पसरवणाऱ्या खानपान स्टॉलवर पश्चिम रेल्वे प्रशासनाची तीव्र कारवाई सुरू आहे. मागील काही दिवसांत नियमांचे उल्लंघन करणारे ३९ हून अधिक स्टाॅल बंद करण्यात आले. नुकताच बोईसर स्थानकावरील एका खानपान केंद्रातून वर्तमानपत्रात गुंडाळून समोशांची विक्री होत असल्याचे आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई विभागातील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छता व खाद्यसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आदिश पठानिया यांनी सर्व परवानाधारकांना नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानक वाणिज्य व्यवस्थापक व वाणिज्य निरीक्षक नियमित तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांचा गणवेश, हातमोजे, केसांची जाळी व स्वच्छतेच्या निकषांची पाहणी करतील. त्याचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर केला जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित परवानाधारक व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नव्या गणवेशानुसार कर्मचाऱ्यांना काळी काॅलर व काळ्या बटणांचे लाल रंगाचे पोलो टी-शर्ट, काळी पूर्ण लांबीची विजार, काळा हाफ-ॲप्रन व काळे बूट घालावे लागतील. टी-शर्टच्या बाह्या व खिशावर काळ्या रंगाची किनार असेल. गणवेश स्वच्छ, इस्त्री केलेला व नीटनेटका असणे आवश्यक आहे. तसेच खाद्यपदार्थ हाताळताना हातमोजे व केसांची जाळी वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
