मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभाग ५ जूनपर्यंत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत शाश्वतता, स्वच्छता आणि पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश देणार आहे. रेल्वे स्थानके, कार्यालये, आगार, लोकल रेक कारशेड, रेल्वे वसाहती आणि इतर रेल्वे परिसरात या मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता मोहीम आणि हरित उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांमध्ये जागतिक पर्यावरणदिन मोहिमेला पर्यावरण जनजागृती उपक्रमांने सुरुवात करण्यात आली. ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६’ या संकल्पनांवर आधारित समाज माध्यम मोहिमेद्वारे कर्मचारी, प्रवासी आणि हितचिंतकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार करण्यात येत आहे. तसेच पर्यावरण संरक्षणाची शपथही प्रत्येक रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्याने घेतली.

मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानकांवर हवामान बदल, शाश्वत जीवनशैली आणि एकल प्लास्टिकला नाही म्हणा, या संदेशांचे फलक, डिजिटल संदेश प्रदर्शित करण्यात आले. प्रवाशांना पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्या, पर्यावरणपूरक पिशव्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आपली स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा, या संदेशाद्वारे प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली.

मुंबई सेंट्रल विभागाने स्थानके, कोचिंग आगार, लोकल रेक कारशेड आणि इतर रेल्वे सुविधांमध्ये कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. प्रवाशांना स्वतंत्र कचराकुंड्यांचा योग्य वापर करण्याबाबत जागरूक करण्यात आले. तसेच स्थानिक समुदायांच्या सहभागातून रेल्वे स्थानके आणि परिसरात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले.

रेल्वे कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांसाठी आयोजित कार्यशाळांमध्ये हवामान कृती, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि दैनंदिन कामकाजात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक कटलरी तसेच विघटनशील पर्यायांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले.

याशिवाय, कागदाचा वापर कमी करण्यासाठी रेलवन आणि इतर ऑनलाइन ॲप्लिकेशन्सद्वारे डिजिटल तिकीट आणि कागदविरहित प्रवासालाही प्रोत्साहन देण्यात आले. या विविध उपक्रमांद्वारे पश्चिम रेल्वेने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.

पश्चिम रेल्वेने विविध उपक्रम राबवून, पर्यावरण जागृतीबाबत संदेश देण्यात येत आहेत. रेल्वे स्थानक, रेल्वे वसाहतीमध्ये हिरवळ वाढविण्यासाठी उद्यानांची निर्मिती केली आहे. पर्यावरण जागरूकता पसरविण्यासाठी पथनाट्ये आयोजित करण्यात आली. स्थानके, रेल्वे रूळ, वसाहती आणि जवळच्या भागात सामुदायिक सहभागाने स्वच्छता उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाबाबत जागरुकता पसरविण्यासाठी रेखाचित्र, निबंध, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यासह विविध स्थानकांवर डिजिटल आणि कागदविरहित तिकीट दिले जात आहे. तसेच ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक उत्पादन विक्रीला प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.