मुंबई : पश्चिम रेल्वेने सुरक्षेसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, भावनगर आणि रतलाम या विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना आणि वडोदरा आणि राजकोट विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रेल्वे रूळाला गेलेला तडा शोधणे, आपत्कालीन ब्रेक लावून प्रवाशाचे प्राण वाचवणे, जनरेटर कारमध्ये आगसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अशा विविध दुर्घटना कर्मचाऱ्यांनी रोखल्या. कर्मचाऱ्यांच्या सतर्कपणामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान टळले. तसेच अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याबाबत महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी पुरस्कार विजेत्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले.