मुंबई :कामाचे जादा तास, मानसिक आणि शारीरिक तणावामुळे अनेक मोटरमन विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. वाढता तण आरोग्यासाठी हानिकारक ठरत असून त्यामुळे काही मोटरमनला ह्रदयविकाराला तोंड द्यावे लागते आहे. नुकताच एकाच दिवशी दोन मोटरमनचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

मोटरमन अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान हे दोघेही पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते. मोहसिन यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. तर, अनुज हे गावी सुट्टीवर होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर मोटरमनवरील कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही वर्षांपासून लोकलचे मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक यांच्या कामाच्या वेळेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

पश्चिम रेल्वेतील मोटरमन अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान या दोघांचा ५ मे रोजी एकाच दिवशी मृत्यू झाला. अनुज सिंग हे पाटण्यात असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. तर मोहसिन खान हे चर्चगेटला एक लोकल सोडल्यानंतर दुसरी लोकल चालवण्यासाठी जात होते. ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळ त्यांच्या छातीत असह्य वेदना सुरु झाल्या. तेथून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र काही वेळातच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन सहकाऱ्यांना गमवावे लागल्याने पश्चिम रेल्वेवर कार्यरत असलेल्या मोटरमन, ट्रेन मॅनेजर या कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोघा सहकाऱ्यांच्या मृत्यूमुळे मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांना मोठा धक्का बसला. सहकाऱयांप्रती दुःख व्यक्त करण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बहुसंख्य मोटरमन, लोकल व्यवस्थापक, रेल्वे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कामाच्या वाढत्या ताणाचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी केली.

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. गाड्यांच्या विलंबाचा थेट मोटरमनच्या विश्रांतीच्या वेळेवर परिणाम होत आहे. मोटरमनना नाश्ता वा जेवण्यासही वेळ मिळत नाही. त्यामुळे मोटरमन, ट्रेन मॅनेजरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या डिसेंबरपासून अनेक मोटरमन वैद्यकीयदृष्ट्या ‘अनफिट’ ठरले आहेत.