मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने ‘प्रोजेक्ट मुंबई’च्या सहकार्याने तिकीट तपासनीस (टीसी), रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी ‘मनस्विन’ या मोफत मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रमाला सुरुवात केली. उच्च तणावाच्या वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचे उद्घाटन सत्र मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील यूसीसी सभागृहात नुकताच पार पडले. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन व मानव संसाधन), तसेच विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी विपणन) उपस्थित होते. या कार्यशाळेत रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ), वाणिज्य आणि परिचालन विभागातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते.

दैनंदिन कामातील तणाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना श्वसनाचे सोपे व्यायाम शिकविण्यात आले. तसेच तणावमुक्ती आणि उत्साहवर्धनासाठी ऊर्जावान नृत्य सत्राचे आयोजन करण्यात आले. सहभागी कर्मचाऱ्यांना मोफत मानसिक आरोग्य टूलकिट आणि ‘स्मायली स्ट्रेस बॉल’चेही वितरण करण्यात आले.

मुंबई सेंट्रल विभागातील अधिकाधिक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी २९ जुलै २०२६ पर्यंत अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तणाव व्यवस्थापनाच्या सोप्या तंत्रांसह विविध विश्रांती उपक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य अधिक सक्षम करण्याचा ‘मनस्विन’ उपक्रमाचा उद्देश असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.