मुंबई : चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) आकारास आलेल्या १५ डबा लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये ही लोकल उभी असून, गेल्या काही दिवसांपासून या लोकलची चाचणी सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर, नवीन १५ डबा लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या नव्या लोकलमुळे १२ डबा लोकलच्या वेळेत १५ डब्याच्या लोकल चालविण्यात येतील. १५ डबा लोकलच्या साधारणपणे १० ते १२ फेऱ्यांची वाढ होण्याची चिन्हे आहेत.
आयसीएफमध्ये १२ डब्यांची लोकल तयार केली जाते. परंतु, मध्य आणि पश्चिम रेल्वे १२ डबा लोकला तीन डबे जोडून १५ डबा लोकल तयार करी होती. प्रवाशांकडून सातत्याने १५ डब्यांच्या लोकलची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन आयसीएफने नुकतीच देशातील पहिली १५ डब्यांची लोकल तयार केली. आयसीएफने सर्वप्रथम ही लोकल पश्चिम रेल्वेला दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असून, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. तसेच लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली जात आहे. परंतु, सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना सामावून घेण्यासाठी १५ डबा लोकल फायदेशीर ठरत आहे. १२ डबा लोकलच्या तुलनेत १५ डबा लोकलमधून २५ टक्के जादा प्रवासी प्रवास करू शकतात. परिणामी, इतर लोकलमधील गर्दीचे प्रमाण कमी होईल.
पश्चिम रेल्वेवरील विरार – चर्चगेट मार्गावर सध्या १५ डब्यांच्या २११ लोकल फेऱ्या धावतात. त्यापैकी विरार – अंधेरीदरम्यान ११२ फेऱ्या धीम्या मार्गावर चालतात. विरार – अंधेरीनंतर वांद्रेपर्यंत १५ डबा लोकलचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या चार स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्याच्या उद्देशाने ९ डब्यांच्या लोकलचे रूपांतर १२ डब्यांत आणि त्यानंतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात आले. पश्चिम रेल्वेवर सर्वात पहिली १५ डबा लोकल २१ नोव्हेंबर २००९ रोजी सुरू झाली.
दुसरा रेक लवकरच तयार होईल
आयसीएफ दुसरी १५ डबा लोकल तयार करीत आहे. या लोकल मध्य किंवा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
