मुंबई : पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नये यासाठी यावर्षी पश्चिम रेल्वेने पूर्वपावसाळी कामांना वेग दिला आहे. दरवर्षी पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर यावर्षी पश्चिम रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गालगत असलेल्या नाल्यांची साफसफाई, गटारांमधील गाळ काढणे, तसेच पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेची दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय, पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील भुयारी गटाराची तपासणी करून पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याचे कामही सुरू आहे. तसेच, पंपिंग यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पाणी उपसा करता येईल, याची काळजी घेतली जात आहे. पश्चिम रेल्वेकडून पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात असून, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे यावर्षी पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत राहील, असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

पश्चिम रेल्वेवरील ६० किमी गटारांची साफसफाई करण्यात येत असून पूरमापकांची संख्या ४०, तर पर्जन्यमापकाची संख्या ६ करण्यात येणार आहे. वारंवार पाणी साचण्याच्या ठिकाणी जास्त पंप बसविण्यात येणार आहेत. ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. परिणामी, तेथे पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत होते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. या स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष देऊ पूर्वपावसाळी कामे हाती घेतली आहेत. पुराचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी १२६ पंप बसवण्यात येणार आहेत. तसेच नाले, रेल्वे रूळ, रेल्वे परिसरातील गाळ, घाण, चिखल माती वाहून नेण्यासाठी मक स्पेशल गाडीच्या ६०० फेऱ्या चालवण्यात येतील.

एप्रिल २०२६ पर्यंत २.५ किमी नाल्यांची दुरूस्ती, ४ किमी नाल्यांची बांधणी केली जाईल. नुकतेच वांद्रे पूर्व भागातील नवपाडा परिसरातील नाले, गटाराची दुरूस्ती करण्यात आली असून मोठ्या व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणे शक्य होईल. या कामामुळे येत्या पावसाळ्यात वांद्रे आणि वांद्रे टर्मिनस परिसरात पाणी साचणार नाही, असा दावा पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.