मुंबई : दिवाळी सणानिमित्त रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असताना विनातिकीट; तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन दीप’ या नावाने दिवसांचे विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम सुरू राहणार आहे.

या अभियानांतर्गत रेल्वेच्या तपासणी पथकांकडून स्थानकांवर; तसेच रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार आहे. विनातिकीट प्रवास करणारे, चुकीच्या श्रेणीतून प्रवास करणारे आणि अन्य प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ‘दीप’ या नावातून मोहिमेची चार टप्प्यांतील कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ‘डी’ म्हणजे डिटेक्टिव्ह अर्थात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांचा शोध घेणे, ‘इ’ म्हणजे एक्झामिन अर्थात तिकिटांची व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, दुसरे ‘इ’ म्हणजे इन्फोस अर्थात रेल्वे नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आणि ‘पी’ म्हणजे पेनॉलिझ अर्थात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करणे, अशा चार टप्प्यांचा समावेश आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने तिकीट तपासणी अधिक प्रभावी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. विनातिकीट प्रवासामुळे नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास टाळणे; तसेच रेल्वेच्या महसुलाचे नुकसान रोखणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तपासनीसांसाठी बॉडी वॉर्न कॅमेरे, काळा कोट

तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रवाशांशी होणारा संवाद अधिक पारदर्शक करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि विशेष स्वरूपाची काळ्या रंगाचे कोट (जॅकेट) दिली आहेत. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, सुरुवातीला १५ बॉडी कॅमेरे आणि ३० विशेष काळ्या रंगाची जॅकेटची व्यवस्था केली आहे.

विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण

– पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास प्रदान करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

– पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये मेल/एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्यामध्ये केली जाते.

– केंद्र सरकारने रेल्वे कायदा १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत तिकीटविना प्रवासासाठीचा किमान दंड ५०० रुपये केला आहे. जन विश्वास (दुरुस्ती तरतुदी) अधिनियम, २०२६ अंतर्गत करण्यात आलेल्या या बदलांमुळे अधिक कठोर आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना मोठा दंडाचा फटका बसत आहे.