मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या सेवेत वाढ केली जात आहे.
पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी १२ अतिरिक्त वातानुकूलित लोकल आणि ३ सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सेवेमध्ये ४ फेऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांची संख्या १,४१० वरून १,४१४ होईल.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलित लोकल प्रवासाच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रतिसाद देत, प्रवाशांना परवडणाऱ्या पर्यायांची गरज ओळखून, पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल सेवांमध्ये भर केली. या वाढीव सेवांमुळे लोकलमधील गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या ११ सामान्य लोकलच्या वेळेत ११ वातानुकूलित लोकल चालवण्यात येतील.
तर, एका नवीन वातानुकूलित लोकलची वाढ करण्यात आली आहे. यासह एकूण वातानुकूलित सेवांची संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. तसेच शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या वातानुकूलित सेवांची संख्या ७७ वरून १०६ पर्यंत वाढली आहे. ज्यामुळे शनिवार-रविवारी वातानुकूलित लोकलचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवाशाचा अनुभव घेता येईल. तर, याव्यतिरिक्त तीन सामान्य सेवा सुरू करण्यात येणार आहेत. सध्या सकाळी ११.३९ वाजता भाईंदर – वांद्रे दरम्यान धावणारी धीमी लोकल सकाळी ११.१९ वाजता विरार येथून धावेल.
नवीन तीन सामान्य लोकलचे वेळापत्रक
- सकाळी १०.४१ वाजता भाईंदरवरून लोकल सुटेल आणि ही लोकल विरार येथे सकाळी ११.१० वाजता पोहचेल.
- दुपारी १.४१ वाजता चर्चगेटवरून लोकल सुटेल आणि ही लोकल वांद्रे येथे दुपारी २.१२ वाजता पोहचेल.
- दुपारी २.५७ वाजता वांद्रेवरून लोकल सुटेल आणि ही लोकल चर्चगेट येथे दुपारी ३.२९ वाजता पोहचेल.
नवीन वातानुकूलित लोकल
- रात्री १०.२० वाजता वसई रोडवरून वातानुकूलित लोकल सुटेल आणि ती बोरिवली येथे रात्री १०.४६ वाजता पोहचेल.
सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल धावणार
डाऊन लोकल
- सकाळी ६.५५ वाजता चर्चगेट-बोरिवली लोकल
- सकाळी ९.१४ वाजता चर्चगेट-गोरेगाव लोकल
- सकाळी ११.१२ वाजता चर्चगेट-मुंबई सेंट्रल लोकल
- दुपारी ४.३० वाजता महालक्ष्मी-बोरिवली लोकल
- सायंकाळी ६.३८ वाजता चर्चगेट-भाईंदर लोकल
- रात्री ९.०८ वाजता अंधेरी-वसई रोड लोकल
अप लोकल
- पहाटे ५.४५ वाजता बोरिवली-चर्चगेट लोकल
- सकाळी ८.०६ वाजता बोरिवली-चर्चगेट लोकल
- सकाळी १०.११ वाजता गोरेगाव-चर्चगेट लोकल
- सायंकाळी ५.२७ वाजता बोरिवली-चर्चगेट लोकल
- रात्री ८.२० वाजता भाईंदर-अंधेरी लोकल
