मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १ सप्टेंबर २०२६ पासून नवे ‘सबर्बन वर्किंग टाइमटेबल-७९’ लागू होणार आहे. या वेळापत्रकात प्रवाशांच्या मागणीनुसार काही फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून एकूण १,४१४ लोकल फेऱ्यांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकात २ अप व ४ डाऊन अशा सहा नवीन धीम्या उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असून, त्याचवेळी सध्याच्या ६ गाड्या सेवा रद्द करण्यात येतील. तसेच वातानुकूलित रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची संख्या १४५ वरून १४७ इतकी वाढवण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वेळापत्रकात २ अप व ४ डाऊन अशा सहा नव्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात सकाळी ७.४६ ची भाईंदर–विरार, सकाळी ११.५८ ची वांद्रे-चर्चगेट, रात्री १०.१४ ची बोरिवली-भाईंदर, रात्री १०.५१ ची बोरिवली-विरार, रात्री १२.२८ ची बोरिवली-भाईंदर, रात्री ११.५१ ची विरार-बोरिवली रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. तर, त्याचवेळी २ अप व ४ डाऊन अशा सहा फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. यात चर्चगेट-बोरिवली व बोरिवली-चर्चगेट दरम्यानच्या दोन वातानुकूलित जलद फेऱ्यांचाही समावेश आहे.
वातानुकूलित गाड्यांमध्ये दोन अतिरिक्त उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन वातानुकूलित लोकलच्या दोन नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. चर्चगेट-बोरिवली-सायंकाळी ५.२८ वाजता आणि बोरिवली-चर्चगेट – सायंकाळी ६.२४ वाजता. त्यामुळे आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी वातानुकूलित रेल्वेगाड्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या १४७ होईल. तर, शनिवार व रविवारी ११६ वातानुकूलित फेऱ्या चालवल्या जातील.
दादर ते डहाणू रोड दरम्यान थेट गाड्यांची सेवा
या वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दादर–विरार व विरार–डहाणू रोड या दोन विद्यमान सेवांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. सुधारित गाडी दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटून रात्री ७.३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. त्यामुळे प्रथमच दादर ते डहाणू रोड दरम्यान थेट लोकल सेवा उपलब्ध होणार आहे.
विरारहून सकाळी ८.२३ ची दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत वाढवण्यात आली असून ती ९.४८ वाजता चर्चगेटला पोहोचेल. तर, चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटणारी सुधारित लोकल नालासोपाऱ्या पर्यंत धावेल. सायंकाळी ६.२२ ची चर्चगेट–विरार जलद वातानुकूलित लोकल व सायंकाळी ७.०५ ची चर्चगेट-विरार वातानुकूलित जलद लोकल बोरिवली येथे थांबणार नाहीत. सकाळी १०.२४ ची चर्चगेट-बोरिवली वातानुकूलित धीमी गाडी, आता गोरेगावपर्यंत धावेल, तर परतीची वातानुकूलित गाडी सेवा गोरेगावहून सुरू होईल.
सहा कमी मागणीच्या फेऱ्या बंद
चर्चगेट-मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट-बोरिवली मार्गावरील काही बिगर गर्दीच्या वेळेतील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेनुसार, एकूण सेवा कमी करण्याऐवजी कमी उपयोगाच्या मार्गांवरील क्षमता प्रवाशांच्या सध्याच्या गरजेनुसार इतर सेवांकडे वळवण्यात आली आहे.
अधिक स्मार्ट वेळापत्रक’
पश्चिम रेल्वेच्या या बदलांचा गाभा म्हणजे अधिक लोकल वाढवण्यापेक्षा विद्यमान १,४१४ फेऱ्यांचा अधिक प्रभावी वापर करणे. गर्दीच्या ठिकाणांवरील अडथळे कमी करणे, जिथे मागणी आहे तिथे थेट जोडणी वाढवणे आणि वातानुकूलित सेवांची क्षमता वाढवणे या तत्त्वांवर नव्या वेळापत्रकाची आखणी करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
