मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकावरील इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंगच्या कामानिमित्त शनिवारी मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत नायगाव स्थानकावरील पादचारी पुलाच्या तुळयांची उभारणी केली जाईल. त्यामुळे लोकल सेवांसह काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक घेतला जाणार नाही.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दादर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कमिशनिंगसाठी १५ मे रोजी रात्री ११ वाजल्यापासून १६ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाचव्या मार्गिकेसह अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. तसेच, नायगाव स्थानकावर रोड क्रेनच्या सहाय्याने पादचारी पुलाच्या दोन स्पॅनचे गर्डर लॉन्चिंग करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर मध्यरात्री २.३० ते ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक असेल.
ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच, डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल भाईदर आणि वसई रोडदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. काही लोकल सेवा रद्दही करण्यात येणार आहेत. प्रभावित सेवांची माहिती संबंधित स्थानक प्रमुखांकडे उपलब्ध राहणार आहे.
ब्लॉकमुळे काही मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. १५ मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९०१६ पोरबंदर – दादर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरिवली येथे समाप्त करण्यात येईल. १६ मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२९२७ दादर – एकता नगर अतिजलद एक्स्प्रेस बोरिवली येथून सुटेल. १७ मे रोजीची गाडी क्रमांक १९००३ दादर – भुसावळ खानदेश एक्स्प्रेसही बोरिवली येथूनच रवाना होईल. याशिवाय, गाडी क्रमांक २२९४६ ओखा – दादर सौराष्ट्र मेलला २ तास १५ मिनिटे उशीर होईल आणि बोरिवली येथेच सेवा समाप्त करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर विशेष गाडीला १ तास विलंब केला जाईल. गाडी क्रमांक १२९२८ एकता नगर – दादर एक्सप्रेसला दीड तास, तर गाडी क्रमांक १४७०७ हनुमानगड – दादर एक्सप्रेसला सूरत – विरारदरम्यान ३० मिनिटे नियंत्रित करण्यात येईल. तसेच, १७ मे रोजीची गाडी क्रमांक २२९५३ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद गुजरात अतिजलद एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून ३० मिनिटे उशिराने सुटेल.
