मुंबई : रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रवाशांच्या मनात असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने पाणी तपासणीचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. २५ ते ३१ ऑक्टोबर या सात दिवसांत पश्चिम रेल्वेच्या विविध मंडळांमध्ये करण्यात आलेल्या २,०३९ चाचण्यांचे निकाल १०० टक्के समाधानकारक लागले आहेत. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत २१ हजारांहून अधिक चाचण्या करून, विविध तपासणी अहवालांमध्येही पाण्याचे सर्व नमुने निर्धारित निकषांनुसार पात्र ठरल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर मंडळांसह दाहोद व अन्य ठिकाणी या चाचण्या झाल्या. २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अवशिष्ट क्लोरीनच्या १,८१२ आणि जिवाणूविषयक २२७ चाचण्या करण्यात आल्या. सर्व नमुने समाधानकारक आढळल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. यापूर्वी २७ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर या कालावधीत पश्चिम रेल्वेने १९ हजार १८ चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये अवशिष्ट क्लोरीनच्या १६ हजार २७९ आणि जिवाणूविषयक २ हजार ७३९ चाचण्यांचा समावेश होता.
या सर्व चाचण्यांचे निकालही समाधानकारक लागल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले होते. त्याचप्रमाणे १७ ते २३ ऑक्टोबरदरम्यान मुंबई सेंट्रल विभागात ३१५ चाचण्या, तर २४ ऑक्टोबरला आठ ठिकाणी एकाच दिवसात ३७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या. या तपासण्यांमध्येही सर्व नमुने पात्र ठरल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
पाणीपुरवठा केंद्रांवर नियमित देखरेख
रेल्वे मंडळाने २४ ऑगस्टपासून देशभरातील रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि फिल्टरची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. पाण्याच्या स्रोतापासून ते प्रवाशांना पाणी उपलब्ध होणाऱ्या ठिकाणापर्यंत गुणवत्ता तपासण्याचे निर्देश देण्यात आले होते. पाण्यातील क्लोरीनची तपासणी निर्जंतुकीकरण प्रक्रिया प्रभावी आहे की नाही, हे तपासण्यासाठी केली जाते. तर जिवाणूविषयक चाचण्यांमधून पाण्यात हानिकारक सूक्ष्मजीव आहेत का, याचे परीक्षण केले जाते. पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाकडून स्थानकांवरील नळ, वॉटर कूलर आणि अन्य पाणीपुरवठा केंद्रांवर नियमित देखरेख ठेवली जात असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.
